अमेरिकेने शुक्रवारी इराक आणि सीरियामधील इराण समर्थित गटांच्या 85 गटांवर जोरदार एअरस्ट्राईक केले. या एअरस्ट्राईकमध्ये 18 इराण समर्थित दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
वॉशिंग्टन : जॉर्डनमध्ये झालेल्या हल्ल्याला जबरदस्त प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने शुक्रवारी इराक आणि सीरियामधील इराण समर्थित गटांच्या 85 गटांवर जोरदार एअरस्ट्राईक (US Airstrike in Iraq) केले. या हवाई हल्ल्यात इराणचे कुड्स फोर्स हे अमेरिकेच्या सैन्याचे प्रमुख लक्ष्य होते. या एअरस्ट्राईकमध्ये 18 इराण समर्थित दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या सैन्याने एका निवेदनाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.
जॉर्डनमध्ये झालेल्या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू
ज्या तळांना अमेरिकन सैन्याने लक्ष्य केले ते इराणच्या IRGC (इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स) म्हणजेच इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड आणि त्यांचे समर्थन असणाऱ्या मिलिशियाचे होते. गेल्या आठवड्यात रविवारी जॉर्डन येथील तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार तर अनेक जखमी झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकच्या लष्कराने ही कारवाई केली आहे.
महत्त्वाची ठिकाणे केली उध्वस्त
अमेरिकेच्या लष्कराने कमांड आणि कंट्रोल मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट आणि इतर क्षेपणास्त्रांचा साठा असलेली ठिकाणे ,ड्रोन आणि शस्त्रास्त्रे आणि दहशतवाद्यांशी संबंधित इतर ठिकाणांना लक्ष्य करत ही स्थळे उद्ध्वस्त (US Airstrike in Syria) केली आहेत. या हल्ल्याबाबत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) म्हणाले की, "ही तर फक्त सुरुवात होती आणि यानंतर आणखी असे स्ट्राईक होतील. अमेरिकेला मध्य पूर्व किंवा जगात कुठेही संघर्ष नको आहे. परंतु जर तुम्ही अमेरिकेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.”
एअरस्ट्राईकमध्ये अमेरिकेकडून बी-1 बॉम्बरचा वापर
या एअरस्ट्राईकमध्ये अमेरिकन लष्कराने लांब पल्ल्याच्या बी-1 बॉम्बरचा वापर केला. इराणच्या लष्कराने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून असा इशारा दिला आहे की या हल्ल्यामुळे या भागात अस्थिर वातावरण तयार होऊ शकते. इराकच्या सैन्याचे प्रवक्ते याह्या रसूल यांनी प्रतिक्रिया दिली की, “हे हवाई हल्ले म्हणजे इराकच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे.”
दरम्यान इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळावर झालेल्या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले होते. ज्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला त्या संघटनेचा इराण सरकारशी संबंध नसून ती संघटना इराण सरकारच्या आदेशावर चालत नाही असे इराणचे म्हणणे होते. इराकी सैन्याने अमेरिकन एअरस्ट्राईकवर निषेध व्यक्त केला त्यावर अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने प्रत्युत्तर दिले आहे. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, “या हल्ल्यापूर्वी आम्ही इराकी सरकारला एअरस्ट्राईकची माहिती दिली होती.”
इस्रायल-हमास युद्धात (Israel Hamas War) पहिल्यांदाच अमेरिकन सैनिकांचा मृत्यू
इस्रायल आणि हमास यांच्यात सात ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, 28-29 जानेवारी 2024 रोजी जॉर्डनमधील सीरियाच्या सीमेजवळ असलेल्या अमेरिकन लष्कराच्या तळावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली आहे.
आणखी वाचा -
US : पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अचानक झाला होता बेपत्ता
US : अमेरिकेत मृताव्यस्थेत सापडला भारतीय विद्यार्थी श्रेयस रेड्डी, यंदाच्या वर्षातील चौथी घटना