रशियाविरुद्धच्या युद्धासाठी निधी उभारण्यासाठी युक्रेन सरकार कर वाढवत आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक कर वाढणार असून बँकांच्या नफ्यावरही अधिक कर लावण्यात येणार आहे.
कीव्ह: गेल्या तीन वर्षांपासून रशियासोबत सातत्याने युद्ध करत असलेल्या युक्रेन सरकारने आता सरकारी तिजोरी भरण्यासाठी जनतेवर युद्ध कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वैयक्तिक कराचा दर १.५% वरून ५% पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच लाखो उद्योजकांवरही नव्याने कर लावण्यात आला आहे.
डिसेंबर १ पासून नवीन नियम लागू होणार आहे. यासोबतच व्यापारी बँकांच्या नफ्यावर ५०% कर आणि इतर वित्तीय संस्थांच्या नफ्यावरील कर २५% पर्यंत वाढवण्यात आला आहे. या वाढीमुळे पुढील आर्थिक वर्षात अतिरिक्त २८,००० कोटी रुपये कर संकलनाची अपेक्षा आहे. युक्रेनच्या संरक्षण क्षेत्रासाठी आर्थिक संसाधने सुरक्षित करण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा असल्याचे सरकारने म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध २९ व्या महिन्यात पोहोचले आहे. आधीच लष्करी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासाठी युक्रेनने प्रचंड खर्च केला आहे. आतापर्यंत, युक्रेनने २०२४ साठी सुमारे १.७ ट्रिलियन ह्रिव्नियांचा संरक्षण खर्च निश्चित केला आहे. या बदलांना अजूनही संसदेचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे आणि ते लागू होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.