
यूकेमधील एका प्रवाशाने दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर दिल्ली मेट्रोचे जोरदार कौतुक केले आहे. यानंतर भारतातील मेट्रोची तुलना युरोपियन शहरांमधील मेट्रोशी होऊ लागली आहे. जॅक हिटनने दिल्ली मेट्रोतील आपल्या प्रवाशाचा एक व्हिडीओ शेअर केला असून, ही मेट्रो युरोपमधील अनेक मेट्रो सिस्टीमपेक्षा खूपच भारी असल्याचं त्याने म्हटलंय.
प्रवाशांना फक्त दिल्ली मेट्रोची स्वच्छता आणि पायाभूत सुविधाच आवडली नाही, तर तिकिटाचे दर ऐकूनही अनेकांना आश्चर्य वाटलं. आपण या प्रवासासाठी फक्त ०.३२ डॉलर्स (सुमारे ३१ रुपये) मोजल्याचे जॅकने सांगितले. यानंतर सोशल मीडियावर भारतातील स्वस्त आणि उत्तम दर्जाच्या सार्वजनिक वाहतुकीवर चर्चा रंगली आहे.
जॅकने आपल्या व्हिडीओमध्ये लिहिलंय: "POV: दिल्लीची मेट्रो युरोपमधील कोणत्याही मेट्रोला सहज मागे टाकते."
कॅप्शनमध्येही त्याने तिकीट दराचा उल्लेख करत लिहिलंय: "आणि इथले दर"
आपला अनुभव शेअर करताना जॅक म्हणाला की, दिल्ली मेट्रोमधील त्याचा पहिला प्रवास फारसा चांगला नव्हता. कारण त्यावेळी काही आंदोलनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पण त्यानंतरचा त्याचा अनुभव खूपच भन्नाट होता.
"खरंतर मी पहिल्यांदा मेट्रोने प्रवास केला तेव्हा थोडा त्रास झाला, पण त्यावेळी आंदोलनं सुरू होती आणि सगळी यंत्रणा ठप्प झाली होती. पण ते सोडलं तर ही एक खूप मोठी मेट्रो सिस्टीम आहे. ती खूप स्वच्छ ठेवली जाते. लंडन अंडरग्राउंडपेक्षा तर ती खूपच आधुनिक आहे, कारण वेळेनुसार यात अनेक तांत्रिक सुधारणा झाल्या आहेत."
त्याने या सेवेच्या स्वस्त दरांवरही भर दिला. आपण या प्रवासासाठी केवळ ०.३२ डॉलर्स म्हणजे जवळपास ३१ रुपये खर्च केल्याचे त्याने सांगितले.
जॅकच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी भारतातील सार्वजनिक वाहतुकीचं कौतुक केलंय, तर काहींनी युरोपियन ट्रान्सपोर्ट नेटवर्कचे फायदे सांगितले आहेत.
एका युजरने कमेंट केली: "भारतातील खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद."
दुसऱ्या युजरने लिहिलं: "युरोपमधील अनेक शहरांमध्ये उत्तम मेट्रो व्यवस्था आहे, पण विश्वासार्हतेच्या बाबतीत दिल्ली मेट्रो जगातील टॉप पाच मेट्रोमध्ये गणली जाते."
तिसऱ्या एका युजरने मात्र ही तुलना अमान्य केली. त्याने युरोपमधील मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा मांडला. तो म्हणाला: "मला तसं वाटत नाही. युरोपची वाहतूक व्यवस्था खूप मजबूत आणि अतुलनीय आहे. ट्राममुळे तुम्हाला अगदी घरापर्यंत कनेक्टिव्हिटी मिळते, मेट्रोचा प्रवास विनाअडथळा असतो आणि बसेस तर त्याहून उत्तम. दिल्ली मेट्रो चांगली आहे, पण तिथे नवीन क्रॉस लाईन्सची गरज आहे आणि इतर ट्रान्सपोर्ट सिस्टीमचीही मदत हवी, कारण तिथे खूप गर्दी असते. त्यामुळे युरोपियन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची तुलना होऊ शकत नाही."
आणखी एका युजरने जॅकच्या मताला दुजोरा देत म्हटलं: "नक्कीच. मी वर्षानुवर्षे दिल्ली मेट्रोने प्रवास करत आहे आणि ही मेट्रो खरोखरच उत्तम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो!"
या चर्चेतून रोजचे प्रवासी आणि परदेशी पर्यटक भारतातील सार्वजनिक वाहतुकीकडे कसं पाहतात, हे समोर आलं आहे. काही युजर्सनी दिल्ली मेट्रोची आधुनिक व्यवस्था आणि स्वस्त दरांबाबत जॅकच्या मताशी सहमती दर्शवली. तर काहींनी असा युक्तिवाद केला की, केवळ एका मेट्रो नेटवर्कची तुलना संपूर्ण युरोपच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी करणे योग्य नाही.
या प्रतिक्रियांमधून कनेक्टिव्हिटी, क्षमता आणि इतर वाहतूक साधनांशी जोडले जाण्याचे महत्त्वही अधोरेखित झाले. आजही अनेक प्रवाशांसाठी दिल्ली मेट्रो त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तिचे स्वस्त दर व उत्तम जाळे परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करत आहे.