
UK Train Stabbing Ten People Injured : पूर्व इंग्लंडमधील केंब्रिजशायर काउंटीमध्ये ट्रेनमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात १० जण जखमी झाले आहेत. यापैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. हा हल्ला काल रात्री ७.०४ वाजता डॉनकास्टरहून लंडन किंग्स क्रॉसला जाणाऱ्या लंडन नॉर्थ ईस्टर्न रेल्वे (LNER) सेवेमध्ये झाला.
या घटनेप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. "केंब्रिजशायरमधील ट्रेनमधील चाकू हल्ल्यानंतर दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ जणांना जीवघेण्या जखमा झाल्या आहेत. दहशतवादविरोधी पोलीस आमच्या तपासात सहकार्य करत आहेत," असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
चाकू हल्ला करणारे अज्ञात व्यक्ती कोण होते? त्यांनी हे भयंकर कृत्य का केले हे अद्याप निश्चित झालेले नाही. "हंटिंगडनला जाणाऱ्या ट्रेनमध्ये अनेक लोकांना चाकूने भोसकल्याच्या घटनेची आम्ही सध्या चौकशी करत आहोत. केंब्रिजशायर पोलिसांसह अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती लवकरच दिली जाईल," असे बीटीपीने (BTP) सांगितले.
"काय घडले हे शोधण्यासाठी आम्ही तातडीने तपास करत आहोत आणि काहीही निश्चित करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. या प्राथमिक टप्प्यावर, घटनेच्या कारणांबद्दल अंदाज लावणे अयोग्य आहे," असे वाहतूक पोलीस मुख्य अधीक्षकांनी एका निवेदनात म्हटले आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर या भागातील ट्रेन सेवा थांबवण्यात आली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून ही घटना 'भयंकर' असल्याचे म्हटले आहे. "हंटिंगडनजवळ ट्रेनमध्ये घडलेली भयंकर घटना अत्यंत चिंताजनक आहे. माझ्या संवेदना सर्व पीडितांसोबत आहेत. पोलिसांच्या जलद कारवाईबद्दल धन्यवाद. लोकांनी पोलिसांच्या सल्ल्याचे पालन करावे," असे स्टार्मर यांनी एक्स (X) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.