
एका ब्रिटिश नागरिकाने पार्किंगचा दंड आकारल्याचा राग आल्याने महिला अधिकाऱ्याच्या तोंडावरच दंडाची पावती फेकून मारली. या कृत्याबद्दल कोर्टाने त्याला चांगलाच दणका दिला आहे. कोर्टाने कॉर्नवॉलमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय स्टीफन लँग याला दंड आणि न्यायालयीन खर्चासह एकूण २,२७०.९० पाउंड (सुमारे २.८७ लाख रुपये) भरण्याचे आदेश दिले आहेत.
कॉर्नवॉलच्या पेनरिन येथील एक्सचेकर क्वे कार पार्कमध्ये ही घटना घडली. स्टीफनने आपली गाडी पार्किंगच्या ठरलेल्या रेषेबाहेर उभी केली होती. त्यामुळे महिला अधिकाऱ्याने त्याला दंडाची पावती दिली. याचा स्टीफनला भयंकर राग आला. त्याने गाडीच्या काचेवर लावलेली पावती काढली, तिचा चोळामोळा केला आणि थेट अधिकाऱ्याच्या तोंडावर भिरकावली. तो तिथून निघून गेला, पण अधिकाऱ्याने खाली पडलेली पावती उचलून पुन्हा गाडीवर ठेवली. हे पाहून स्टीफन परत आला आणि त्याने पुन्हा ती पावती अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली.
हा सगळा प्रकार महिला अधिकाऱ्याच्या बॉडी कॅमेऱ्यात आणि कार पार्किंगच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. अधिकाऱ्यांनी पावती फेकून मारण्याच्या या प्रकाराला 'कचरा फेकणे' मानले आणि त्याला २५० पाउंडचा दंड ठोठावला. पण अनेकदा आठवण करून देऊनही स्टीफनने दंड भरला नाही. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी ट्रुरो मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली, पण स्टीफन तिथेही हजर राहिला नाही. अखेर कोर्टाने त्याला दोषी ठरवले. कोर्टाने त्याला २५० पाउंड दंड, १,९२०.९० पाउंड न्यायालयीन खर्च आणि पीडितेला १०० पाउंड अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश दिले. कौन्सिलने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे आणि अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.