
Two gunmen opened fire at Sydney Beach 10 died and many injured : अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या गोळीबाराची घटना ताजीच असताना आता ऑस्ट्रेलियात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. ज्यू सणाच्या वेळी हा गोळीबार झाल्याने हल्लेखोरांचे टार्गेट ज्यू असल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बॉन्डी बीच येथे आज रविवारी सायंकाळी (स्थानिक वेळेनुसार) घडलेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दोन सशस्त्र हल्लेखोरांनी गर्दीवर अंदाधुंद गोळीबार केल्याने, त्यात किमान १० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार सुमारे दोन तासांपूर्वी झाला आणि यावेळी सुमारे ५० गोळ्या झाडल्या गेल्या. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, बॉन्डी येथील दृश्ये "धक्कादायक आणि त्रासदायक" असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "पोलिस आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके सध्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. माझ्या संवेदना या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आहेत. मी तातडीने एएफपी आयुक्तांशी आणि न्यू साउथ वेल्स प्रीमियरशी संपर्क साधला आहे. आम्ही NSW पोलिसांसोबत मिळून काम करत आहोत आणि अधिक माहिती जसजशी निश्चित होईल, तसतसे पुढील अपडेट्स दिले जातील. मी परिसरातील लोकांना NSW पोलिसांच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करतो."
भारतीय वेळेनुसार दुपारी २.१७ वाजता (ऑस्ट्रेलियाई वेळेनुसार संध्याकाळी ७.४७ वाजता), न्यू साउथ वेल्स पोलिसांनी त्यांच्या 'X' खात्यावर ही "डेव्हलपींग असलेली घटना" असल्याचे जाहीर केले आणि "घटनास्थळी असलेल्या कोणीही तात्काळ आश्रय घ्यावा," असा धोक्याचा इशारा दिला. पोलिसांनी नंतर दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना परिसरापासून दूर राहण्याचे आणि सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हल्ल्याच्या व्हिज्युअलमध्ये काळ्या कपड्यांमध्ये असलेले दोन हल्लेखोर गर्दीवर गोळीबार करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, हा गोळीबार ज्यू लोकांच्या 'हनुक्का' या आठ दिवसांच्या सणाच्या पहिल्या रात्री घडला. 'द सिडनी मॉर्निंग हेराल्ड' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ज्यू सणाची सुरुवात म्हणून समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शेकडो लोक जमले असताना, संध्याकाळी ६.३० वाजल्यानंतर (ऑस्ट्रेलियाई वेळेनुसार) हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हल्लेखोरांनी लहान मुले आणि वृद्धांनाही लक्ष्य केले. घटनेनंतर काही लोक जखमींवर सीपीआर (CPR) करताना दिसले.
विरोधी पक्षनेत्या सुसान ले यांनी या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. "द्वेषपूर्ण हिंसाचाराने बॉन्डीसारख्या प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन समुदायाच्या केंद्रस्थानी हल्ला केला आहे. हा हल्ला आमच्या ज्यू समुदायाच्या 'हनुक्का बाय द सी' या शांतता आणि आशेच्या उत्सवाच्या वेळी झाला, ज्याला द्वेषाने भंग केले आहे. आज आम्ही ऑस्ट्रेलियन म्हणून या गहन शोकांतिका आणि धक्क्याच्या क्षणी, द्वेषाविरुद्ध एकजूट होऊन उभे आहोत," असे त्यांनी म्हटले आहे.
जखमींवर उपचार सुरू असून, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करत आहेत.