Hormuz Strait : ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न! 20% टोल रद्द, आखाती देशांसोबत नवी डील

Published : Jul 14, 2026, 11:26 PM IST
Hormuz Strait : ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न! 20% टोल रद्द, आखाती देशांसोबत नवी डील

सार

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20% टोल लावण्याच्या घोषणेवरून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली आहे. आखाती देशांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून, आता त्याऐवजी मोठे व्यापारी करार केले जाणार आहेत.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20 टक्के टोल लावण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. आखाती देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही घोषणा केली. आता या 20 टक्के फीऐवजी अमेरिका आणि विविध आखाती देशांमध्ये मोठे व्यापार आणि गुंतवणूक करार केले जातील, असं ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्ट केलं आहे.

मध्य पूर्वेत तणाव वाढल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका घेईल आणि त्याबदल्यात तिथून जाणाऱ्या जहाजांकडून 20 टक्के टोल वसूल करेल, अशी घोषणा ट्रम्प यांनी आधी केली होती. मात्र, आता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. "आखाती देशांच्या नेत्यांसोबतची चर्चा यशस्वी झाली. अमेरिकेला खर्चाची भरपाई म्हणून द्यायच्या 20% फीऐवजी, आता विविध आखाती देश अमेरिकेत मोठी गुंतवणूक करतील. ही गुंतवणूक प्रचंड मोठी असेल आणि आखाती देशांसाठीही ती खूप फायदेशीर ठरेल," असं ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की, होर्मुझची सामुद्रधुनी आता इराण वगळता इतर सर्व देशांच्या जहाजांसाठी खुली करण्यात आली आहे. इराणच्या नेतृत्वाला 'खोटारडं, हिंसक आणि द्वेषपूर्ण' संबोधत ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली. "हे नेतृत्व आपल्या देशाला पूर्ण विनाशाच्या मार्गावर नेत आहे. त्यामुळे, इराणच्या बंदरांवर येणाऱ्या-जाणाऱ्या किंवा इराणचा माल वाहून नेणाऱ्या जहाजांवर संपूर्ण बंदी घालण्यात येईल," असंही त्यांनी जाहीर केलं.

या नव्या करारामुळे अमेरिकेला मोठा फायदा होईल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. "इतिहासात इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेत जास्त डॉलर्सची गुंतवणूक आहे आणि या नव्या गुंतवणुकीमुळे ती आणखी वाढेल. कारखाने, प्लांट आणि उपकरणं यांचा ऐतिहासिक ओघ अमेरिकेकडे येईल. यामुळे लाखो अमेरिकन लोकांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील," असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी इराणला इशारा दिला, "इराणने लाखो लोकांना मारण्याचे दिवस आता संपले आहेत. इराणला कधीही अणुबॉम्ब बनवता येणार नाही."

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय