Gold Reserves : जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर?

Published : Oct 14, 2026, 10:00 AM IST

अनेक देश सध्या स्वतःकडचा सोन्याचा साठा वेगाने वाढवत आहेत. जगात सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत चीनने आता पाचव्या नंबरवर झेप घेतली आहे. मग आपल्या भारताकडे किती सोनं आहे आणि आपण कितव्या स्थानावर आहोत? याची सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत.

PREV
15
देशांमधील सोन्याचा साठा

जागतिक अर्थव्यवस्थेत सोन्याचं महत्त्व किती आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. संकटाच्या काळात देशाचा आर्थिक पाया भक्कम ठेवण्याचं काम हाच सोन्याचा साठा करतो. नुकत्याच आलेल्या ग्लोबल डेटानुसार, जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत चीनने मोठी मुसंडी मारली आहे. रशियाला मागे टाकत चीन आता जगातला ५ वा सर्वात मोठा गोल्ड रिझर्व्ह असलेला देश बनला आहे. सध्या चीनच्या पुढे फक्त अमेरिका, जर्मनी, इटली आणि फ्रान्स हे देश आहेत.

प्रसिद्ध फायनान्शियल प्लॅटफॉर्म 'द कोबेसी लेटर'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, चीनकडे सध्या तब्बल २,४१० टन सोन्याचा साठा आहे. टॉप-३ देशांच्या यादीत पोहोचण्याच्या चीन आता खूपच जवळ आहे. फ्रान्सकडे २,४३७ टन आणि इटलीकडे २,४५२ टन सोनं आहे.

म्हणजेच, चीन आता फ्रान्सच्या फक्त २७ टन आणि इटलीच्या ४२ टन मागे आहे. या यादीत आपला भारत ८८१ टन सोन्याच्या साठ्यासह ८ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, भारताच्या तुलनेत चीनकडे जवळपास ३ पट जास्त सोनं आहे.

25
चीन

चीनची मध्यवर्ती बँक असलेली 'पीपल्स बँक ऑफ चायना' सध्या न थांबता सोन्याची खरेदी करत आहे. याच वेगाने जर त्यांनी खरेदी सुरू ठेवली, तर या वर्षाच्या अखेरीस चीन फ्रान्स आणि इटलीला मागे टाकेल. आणि जगातला ३ रा सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेला देश बनेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

35
चीनची सोन्यात सर्वाधिक खरेदी

गेल्या २३ महिन्यांपासून चीनने एकही महिना न चुकता सलग सोन्याची खरेदी केली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यातच चीनच्या बँकेने तब्बल २३ टनांहून अधिक सोनं खरेदी केलं. गेल्या वर्षभरात चीनने एकाच महिन्यात केलेली ही सर्वात मोठी खरेदी आहे. याआधी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही त्यांनी दरमहा २० टनांहून अधिक सोनं आपल्या तिजोरीत जमा केलं होतं. या वर्षात सप्टेंबरपर्यंतचा विचार केला, तर चीनने एकूण १०३ टनांहून अधिक नवीन सोनं खरेदी केलं आहे.

45
सोन्याचे दर वाढण्यामागील कारण

एकीकडे विविध देश आपला सोन्याचा साठा वाढवत आहेत, तर दुसरीकडे जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडत आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने प्रति औंस ४,२०७ डॉलर्सचा विक्रमी टप्पा गाठला आहे. दुसरीकडे चांदीनेही वेग पकडला असून ती प्रति औंस ६१.१२ डॉलर्सवर ट्रेड करत आहे.

सोन्याचे दर असे अचानक वाढण्यामागे दोन मुख्य कारणं आहेत..

१. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईची चिंता थोडी कमी झाली आहे.

२. अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवणं थांबवेल, असा गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक पुन्हा सोन्यात मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवत आहेत.

55
टॉप १० देशांची लिस्ट

द कोबेसी लेटरच्या आकडेवारीनुसार.. सोन्याचा साठा (टनांमध्ये) असलेली टॉप १० देशांची यादी खालीलप्रमाणे आहे:

१. अमेरिका - ८,१३३

२. जर्मनी - ३,३५१

३. इटली - २,४५२

४. फ्रान्स - २,४३७

५. चीन - २,४१०

६. रशिया - २,३०५

७. स्वित्झर्लंड - १,०४०

८. भारत - ८८१

९. जपान - ८४६

१०. नेदरलँड्स - ६१३

टीप: या यादीत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF) च्या साठ्याचा समावेश केलेला नाही. आयएमएफकडे सध्या सुमारे २,८१४ टन सोनं आहे.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories