
जपानमध्ये घड्याळ चोरीच्या एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका भामट्याने सुमारे २.७ कोटी रुपये किंमतीचं 'ऑडेमार्स पिगे' (Audemars Piguet) कंपनीचं घड्याळ चोरलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने एका चिठ्ठीत माफीनामा लिहून हे घड्याळ कुरिअरने टोकियोमधल्या त्याच दुकानात परत पाठवलं. ग्राहकाच्या वेशात येऊन त्याने ही चोरी केली होती. आता घड्याळ तर परत मिळालंय, पण या रहस्यमय प्रकारामुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
ही घटना २९ ऑक्टोबर रोजी टोकियोच्या नाकानो वॉर्डमधील 'नाकानो ब्रॉडवे' शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घडली. इथल्या तिसऱ्या मजल्यावर 'कामे-किची नाकानो होन्तेन' नावाचं घड्याळांचं दुकान आहे. रिपोर्ट्सनुसार, एक माणूस या दुकानात आला आणि त्याने कर्मचाऱ्याला एक लक्झरी घड्याळ घालून पाहण्याची विनंती केली.
पहिलं घड्याळ परत केल्यानंतर त्याने दुसरं घड्याळ दाखवायला सांगितलं. हे स्विस बनावटीचं 'ऑडेमार्स पिगे' घड्याळ होतं, ज्याची किंमत सुमारे ४६ दशलक्ष येन (सुमारे २.७ कोटी रुपये) होती. कर्मचाऱ्याने ते घड्याळ त्याच्या मनगटावर बांधलं. त्यानंतर तो माणूस दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या आरशाकडे गेला. तिथे असलेल्या खुर्चीवर बसण्याचं नाटक करत त्याने अचानक घड्याळासह तिथून पळ काढला.
हा संशयित चोर दुकानात साधारण आठ मिनिटे थांबला होता. पळून जाताना त्याने गडद रंगाचं जॅकेट, पँट आणि टोपी घातली होती. या घटनेवेळी दुकानात दोन कर्मचारी उपस्थित होते, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
या प्रकरणाला १ नोव्हेंबर रोजी एक अनपेक्षित वळण लागलं. दुकानात एक कुरिअर आलं. त्यात तेच चोरीला गेलेलं घड्याळ आणि चोरीबद्दल माफी मागणारी एक हाताने लिहिलेली चिठ्ठी होती. कर्मचाऱ्यांनी घड्याळाचा सिरीयल नंबर तपासला आणि हे तेच घड्याळ असल्याची खात्री केली. विशेष म्हणजे, या घड्याळाला कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं.
हे पार्सल आयची प्रीफेक्चर (Aichi Prefecture) इथून पाठवण्यात आलं होतं. त्यावर पाठवणाऱ्याचं नाव आणि पत्ता लिहिला होता, पण तो खोटा असावा असा पोलिसांचा संशय आहे.
एवढं महागडं घड्याळ परत मिळूनही, टोकियो मेट्रोपॉलिटन पोलीस या संशयित चोराचा शोध घेत आहेत. हे पार्सल नेमकं कोणी पाठवलं, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेवर दुकानाच्या मालकांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
सुरुवातीला ही एक साधी घड्याळ चोरीची घटना वाटत होती, पण या रहस्यमय कुरिअरमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.