चीनच्या लष्करी हालचालींमुळे तैवान चिंतेत, ९ विमाने-६ नौका तैनात

शनिवारी १७ चिनी विमाने आणि सहा नौदल जहाजे आढळून आल्याची माहिती तैवानने दिली होती.

तैपे: तैवानजवळ पुन्हा एकदा चीनने लष्करी शक्तीप्रदर्शन केले आहे. द्वीपसमूहाभोवती नऊ चिनी विमाने आणि सहा नौदल जहाजे आढळून आल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. त्यापैकी चार विमाने मीडियन लाइन ओलांडून तैवानच्या नैऋत्य आणि पूर्वेकडील हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात (ADIZ) शिरली.

शनिवारी पीपल्स लिबरेशन आर्मीची (PLA) १७ विमाने आणि सहा नौदल जहाजे द्वीपसमूहाभोवती आढळून आली होती. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे आणि आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, तैवानच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रातून उपग्रह वाहून नेणारे रॉकेट चीन प्रक्षेपित करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

गेल्या दोन वर्षांत चीनने तैवानमधून किंवा त्याच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रातून किमान दहा उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. मात्र, या प्रक्षेपणांमुळे तैवानच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला नाही, असा अंदाज आहे. तैवानला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग मानण्याचा चीनचा प्रयत्न आहे. मात्र, तैवान स्वतःला एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक मानतो. तैवान हे स्वायत्त क्षेत्र आपलेच असल्याचा चीनचा जुना दावा आहे. मात्र, तैवान हा दावा मान्य करत नाही.

Share this article