गुजरातचा व्यक्ती FBIच्या मोस्ट वॉन्टेड यादीत

अमेरिकेची गुप्तचर संस्था FBI च्या मोस्ट वॉन्टेड यादीत गुजरातचा एक व्यक्ती आहे. गेल्या १० वर्षांपासून FBI त्याचा शोध घेत आहे.

अमेरिकेची गुप्तचर संस्था FBI च्या मोस्ट वॉन्टेड यादीत गुजरातचा एक व्यक्ती आहे. गेल्या १० वर्षांपासून FBI त्याचा शोध घेत आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल १० वर्षांपूर्वी अमेरिकेत आपल्या पत्नीचा खून करून पळून गेला होता. आतापर्यंत फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला त्याचा शोध लागलेला नाही. गुजरातचा ३४ वर्षीय भद्रेशकुमार पटेलने २०१५ च्या एप्रिलमध्ये आपल्या पत्नीचा खून केला होता. त्यानंतर तो FBI च्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे.

पटेल कुठे आहे याची माहिती देणाऱ्यांना FBI ने पुन्हा एकदा आवाहन केले आहे. भद्रेशकुमार पटेल हा सशस्त्र आणि अत्यंत धोकादायक व्यक्ती असल्याचे FBI ने जाहीर केले आहे. आमच्या दहा मोस्ट वॉन्टेड फरारांपैकी एक असलेल्या भद्रेशकुमार चेतनभाई पटेलला शोधण्यासाठी FBI ला मदत करा. ३४ वर्षीय पटेलविषयी तुमच्याकडे काही माहिती असल्यास, FBI ला संपर्क साधा, असे आवाहन कायदा अंमलबजावणी संस्थेने आपल्या एक्स (ट्विटर) पोस्टद्वारे केले आहे. त्याच्याविषयी माहिती देणाऱ्यांना FBI ने $२५०,००० म्हणजेच २,१६,४६,६००.०० (२ कोटी १६ लाख ४६ हजार ६०० रुपये) इतके बक्षीस जाहीर केले आहे.

भद्रेशकुमार चेतनभाई पटेल कोण आहे?
भद्रेशकुमार चेतनभाई पटेल हा एक भारतीय व्यक्ती आहे जो एप्रिल २०१५ मध्ये आपली पत्नी पालक हिचा खून केल्याबद्दल अमेरिकन संस्थेला हवा आहे. त्याचा जन्म १९९० मध्ये गुजरातमध्ये झाला होता.

FBI च्या मते, पटेल १२ एप्रिल २०१५ रोजी मेरीलँडमधील हॅनोव्ह येथील डोनट दुकानात काम करत होता. त्यावेळी त्याने आपल्या पत्नीला एखाद्या वस्तूने अनेक वेळा मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पटेलवर अनेक आरोप आहेत, त्यात प्रथम श्रेणीचा खून, द्वितीय श्रेणीचा खून, प्रथम श्रेणीचा हल्ला, द्वितीय श्रेणीचा हल्ला आणि जखमी करण्याच्या उद्देशाने धोकादायक शस्त्राचा वापर करणे यांचा समावेश आहे.

२०१५ मध्ये, भद्रेशकुमार पटेल मेरीलँडमधील डंकिन डोनट्स आउटलेटमध्ये काम करत असताना त्यांनी आपली पत्नी पालक हिचा खून केला. पटेलने दुकानाच्या मागील बाजूस स्वयंपाकघरातील चाकूने आपली पत्नी पालक हिच्यावर अनेक वार करून अनेक जखमा केल्याचा आरोप आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना उशिरा हा खून झाला, जो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यावेळी भद्रेशकुमार २५ वर्षांचा होता तर पत्नी पालक २१ वर्षांची होती. पटेल आणि त्यांची पत्नी पालक यांच्यात मतभेद असावेत असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. खुनाच्या एक महिना आधी त्यांचा व्हिसा कालावधी संपला होता त्यामुळे पालक भारतात परत जाऊ इच्छित होती तर पटेल अमेरिकेतच राहू इच्छित होता.

Share this article