Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये मराठमोळ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. धोनीच्या शांत स्वभावाने प्रेरित होत त्याने हे यश मिळवल्याचे सांगितले.
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. कांस्य पदक पटकवल्यानंतर मराठमोळ्या स्वप्नीलने सांगितले की, मी क्रिकेटपटू एमएस धोनीचा खूप मोठा चाहता असून त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे. क्रिकेटपटू एमएस धोनी जसा खेळताना शांत राहतो, तेच मी एमएस धोनी यांच्याकडून शिकल्याचे त्याने सांगितले आहे.
मी क्रिकेटपटू एमएस धोनीचा जबरा फॅन : नेमबाज स्वप्नील कुसाळे
मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेच्या या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कांस्य पदक पटकवल्यानंतर स्वप्नील म्हणाला की, मी ध्येयावर लक्ष्य ठेवून काम करत होतो, एवढ्या वर्षात जे फॉलो करत होतो, तेच इथे केले. माझे काही की पॉईंट्स होते, त्यावरच काम केले. मी क्रिकेटपटू एमएस धोनीचा खूप मोठा चाहता आहे. जसा तो फिल्डवर शांत राहतो, तेच मी धोनीकडून शिकलो, फिल्डवर शांत राहून काम करतो. रुटीन होते तेच फॉलो केले. हे पहिलं ऑलिम्पिक होते, कांस्य जिंकले, आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करेन, अशी प्रतिक्रिया स्वप्नील कुसाळे याने दिली आहे.
क्रिकेटपटू एमएस धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली : नेमबाज स्वप्नील कुसाळे
स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की, त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते.
ध्येयवेड्या स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास
स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने 12 वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला होता. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.
स्वप्नील कुसळेने रचला इतिहास
भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने प्रथमच पदक जिंकले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे.या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले.
आणखी वाचा :
खाशाबा जाधवनंतर मराठमोळ्या स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले कांस्यपदक!