खाशाबा जाधवनंतर मराठमोळ्या स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले कांस्यपदक!

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्याने हे यश मिळवले.

Rameshwar Gavhane | Published : Aug 1, 2024 8:49 AM IST / Updated: Aug 01 2024, 02:45 PM IST

Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या पोराने इतिहास रचला आहे. तब्बल 72 वर्षानंतर मराठी माणसाने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे. 1952 मध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले.

भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरे कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.

 

 

स्वप्नीलच्या कामगिरीने देशाला दिला आनंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्नील कुसळेचे x वर पोस्ट करून अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, "स्वप्नील कुसळेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्समध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याने प्रत्येक भारतीयाला आनंद दिला आहे."

 

 

 

अभिनव बिंद्रा यांनी स्वप्नीलचे केले अभिनंदन

अभिनव बिंद्राने इंस्टाग्रामवर पोस्ट करून स्वप्नीलचे ऑलिम्पिक पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले, "पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलच्या नेमबाजीत कांस्यपदक मिळाल्याने रोमांचित झालो. तुझी मेहनत, संयम आणि उत्कटतेचे खरेच फळ मिळाले आहे. तुला आणखी अनेक विजय आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा."

कोण आहे नेमबाज स्वप्नील कुसाळे?

नेमबाज स्वप्नील कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. 6 ऑगस्ट 1995 मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसच्या धरतीवर चमकदार कामगिरी केली आहे. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने 12वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

स्वप्नील कुसाळे मध्य रेल्वेत कार्यरत

स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की, त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते.

आणखी वाचा : 

'मी सर्वोत्तम कामगिरी करणार', कांस्यपदक विजेत्या मनू भाकरची खास मुलाखत

 

 

 

 

 

Read more Articles on
Share this article