रशिया एकीकडे युद्धाच्या तणावात असताना दुसरीकडे घटणारा जन्मदर देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. लोकसंख्येत वाढ होण्यासाठी तेथील सरकार प्रयत्न करत आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाने लागू न केलेले नियम येथील सरकार लागू करत आहे. शारीरिक संबंध वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासोबतच पहिल्या डेटसाठी मदत करण्यापर्यंत सर्व प्रयत्न सरकार करत आहे. रशियाच्या प्रत्येक भागात वेगवेगळे नियम लागू होत आहेत. स्थानिक सरकारला लोकसंख्या वाढीची जबाबदारी देण्यात आली आहे.
रशियात विचित्र नियम लागू: जोडप्यांमध्ये जवळीकता वाढवण्यासाठी अडथळा-मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. याच कारणास्तव रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत घरात इंटरनेट आणि वीज बंद करण्याचा प्रस्ताव आहे. या वेळेत शारीरिक संबंध वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे हा सरकारच्या योजनेचा एक भाग आहे. पूर्वी टीव्ही, इंटरनेटसह कोणतेही मनोरंजन लोकांकडे नव्हते. त्यामुळे ते जास्त मुले जन्माला घालत होते असे म्हटले जाते. नेट, टीव्ही लोकांचे लक्ष वेगळीकडे वळवतात. उशिरापर्यंत लोक झोपायला जात नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन सरकार रात्री दहा वाजता वीज आणि नेट बंद करण्याची व्यवस्था करत आहे.
पहिल्या रात्रीचा खर्च सरकारकडून!: नवविवाहितांच्या लग्नाच्या रात्रीचा खर्च राज्य सरकारने करावा अशी एका शिफारशीत सूचना आहे. एवढेच नाही तर जोडीदाराच्या पहिल्या डेटसाठीही सरकार पैसे देणार आहे. पहिल्यांदा डेटवर जाणाऱ्या जोडीला सरकार ५,००० रुबल म्हणजे सुमारे ४,३०२ रुपये देणार आहे.
हॉटेलमध्ये जोडप्यांना त्यांचा वेळ घालवण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल रूमचे दर कमी केले आहेत. गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी हॉटेलचा खर्च २६,३०० रुबल म्हणजे २२,६३२ रुपयांपर्यंत मर्यादित करावा अशी शिफारस करण्यात आली आहे.
गृहिणींना आर्थिक मदत: घरात मुले असल्यास महिलांच्या करिअरवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे गांभीर्याने घेत सरकार घरातील महिलांना घरकामासाठी आर्थिक मदत देण्यास पुढे आले आहे. काही भागात या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. खाबरोव्स्कमध्ये १८ ते २३ वयोगटातील तरुणींना मुलाला जन्म देण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ९०० युरो म्हणजे सुमारे ९८,०२९ रुपये दिले जात आहेत. चेल्याबिन्स्कमध्ये पहिल्या मुलाला बक्षेस म्हणून ८,५०० युरो म्हणजे ९.२६ लाख रुपये मिळतात.
यापूर्वी प्रादेशिक आरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शस्तोपालोव्ह यांनी रशियन लोकांना त्यांच्या आयुष्यात 'सेक्स अॅट वर्क' ही योजना स्वीकारण्याचे आवाहन केले होते. जेवणाच्या आणि कॉफी ब्रेकच्या वेळेत मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही ब्रेकच्या वेळेतही संतती निर्माण करू शकता कारण जीवन खूप वेगाने पुढे जाते असे शस्तोपालोव्ह म्हणाले होते.