‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची डिप्लोमॅटिक स्ट्राइक, पाकिस्तानचा ‘शांतीदूत’ प्लॅन; जागतिक रणांगणावर नवे चक्र

Published : May 18, 2025, 12:59 PM IST
Shehbaz Sharif

सार

भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्यासाठी डिप्लोमॅटिक मोहीम राबवत आहे. पाकिस्तान 'शांतीदूत' बनून जगाला आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराच्या अचूक आणि जोरदार कारवाईनंतर आता लढाई केवळ सीमित राहिलेली नाही, तर ती थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून भारताने दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या कारवाईनंतर भारताचं लक्ष आता जागतिक राजकारणाच्या पटावर केंद्रित झालं आहे आणि तिथेच सुरु झाला आहे ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’चा पुढचा टप्पा.

भारताचा डाव, "दहशतवादाचा पोशिंदा" म्हणून पाकिस्तानचा पर्दाफाश!

दहशतवादाविरोधातील लढाईला आता भारत सरकारनं एक नवी धार दिली आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ची खरी माहिती आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं जगभरातील महत्त्वाच्या ७-८ राष्ट्रांमध्ये पाठवली जातील.

या शिष्टमंडळांमध्ये काँग्रेसचे शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी यांचा समावेश आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांचा सहभाग या मोहिमेचं गांभीर्य अधोरेखित करतो.

पाकिस्तानचा 'शांतीदूत' प्लॅन, जगाला शांततेचा मुखवटा?

दुसरीकडे, भारताच्या या आक्रमक डिप्लोमॅटिक खेळीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने नवा प्लॅन आखला आहे. ‘शांतीदूत’ बनून जगापुढे आपली बाजू मांडण्याचा. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याकडे नेतृत्व सोपवले असून, हे प्रतिनिधीमंडळ विविध देशांमध्ये जाऊन पाकिस्तानची बाजू मांडणार आहे.

बिलावल भुट्टो यांनी सोशल मीडियावर लिहिलं "ही जबाबदारी स्वीकारून मला पाकिस्तानची सेवा करण्याचा सन्मान मिळतोय. हा काळ कठीण आहे, पण शांततेसाठी आमचा प्रयत्न चालू राहील." पण खरा प्रश्न असा आहे, अनेकदा चुकीची माहिती आणि फसव्या दाव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानकडून जगाला नेमकं काय सांगितलं जाणार?

जागतिक व्यासपीठावर सामना, सत्य विरुद्ध प्रचारयंत्रणा

या संपूर्ण संघर्षाचं केंद्रबिंदू एकच आहे. पाकिस्तानचा दहशतवादासोबत असलेला संबंध. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने हे स्पष्ट केलं की, तो केवळ संरक्षण करत नाही, तर आक्रमण करायला तयार आहे. भारताची शिष्टमंडळं देशोदेशीच्या सरकारांना, माध्यमांना आणि थिंक टँक्सना स्पष्टपणे हे पटवून देणार आहेत की पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना आधार देतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि भारतविरोधी कारवायांना खतपाणी घालतो.

त्याचवेळी, पाकिस्तान शांतीचा मुखवटा घालून आपली बाजू सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यांचा विश्वसनीयतेचा आलेख ड्रोन हल्ल्यांमुळे आणि सातत्याने नाकारलेल्या दहशतवादी कारवायांमुळे आधीच घसरलेला आहे.

रणभूमी आता शब्दांची, सत्याची

सीमेवर बंदुका थांबल्या तरी, आता सुरू आहे सत्य आणि प्रचार यांचं युद्ध. भारत 'डिप्लोमॅटिक स्ट्राइक'च्या माध्यमातून जगाला जागं करत आहे, तर पाकिस्तान अजूनही 'शांती'चं ढोंग करत आहे. ही जागतिक स्तरावरची डावपेचांची लढाई कोण जिंकेल, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर