पाकिस्तानात दहशत : बॉम्बस्फोटाने बलुचिस्तान हादरले, 2 निष्पापांनी गमावला जीव

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील पिशीन जिल्ह्यात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात दोन मुलांसह अठरा जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. सुरखाब चौकाजवळील बाजारपेठेत दुचाकीत बॉम्ब ठेवण्यात आल्याने हा स्फोट झाला.

Rameshwar Gavhane | Published : Aug 25, 2024 9:15 AM IST

पाकिस्तान सध्या मंदी आणि महागाईच्या संकटातून जात आहे. शनिवारी येथे झालेल्या बॉम्बस्फोटाने बलुचिस्तान हादरले. पिशीन जिल्ह्यात भीषण बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला, तर 7 पोलीस कर्मचाऱ्यांसह 16 जण जखमी झाले. जिल्ह्यातील सुरखाब चौकाजवळील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडली. बलुचिस्तानमध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे स्फोटक कुठून आले आणि त्यात कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे.

बाईकमध्ये ठेवण्यात आला होता बॉम्ब

पिशीन जिल्ह्यातील सुरखाब चौकाजवळील बाजारपेठेत दुचाकीमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. या घटनेत दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटामुळे शेजारी उभ्या असलेल्या तीन वाहनांचेही मोठे नुकसान झाले. दहशतवादविरोधी विभाग आणि बॉम्ब पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास केला आणि काही महत्त्वाचे पुरावेही गोळा केले. सध्या पोलीस बंदोबस्तासह परिसरातील मुख्य घटनास्थळ सील करण्यात आले आहे.

व्यावसायिकांमध्ये पसरली घबराट

मार्केटमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. घरातून बाहेर पडतानाही लोक कचरत आहेत. पाकिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. आधी महागाईने जनता हैराण झाली आणि आता दहशतवादी घटनांमुळे ते दहशतीत आले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीएम शाहबाज यांनी आरोपींची ओळख पटवण्याच्या दिल्या सूचना

पिशीन उपायुक्त कार्यालयाजवळ हा स्फोट झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला. मुले आणि निष्पाप लोकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांना याची किंमत चुकवावी लागेल, असे म्हटले आहे. ते माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. पंतप्रधानांनी जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आणि अधिकाऱ्यांना घटनेतील आरोपींची ओळख पटवण्यास सांगितले.

आणखी वाचा : 

1971 मध्ये पाकिस्तानचा आत्मसमर्पण पुतळा पाडला, भारताच्या विरोधकांनी रचला कट

 

Share this article