Israel Elections : इस्रायलमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप, नेतन्याहू आणि लष्करप्रमुखांमध्ये खडाजंगी

Published : Oct 26, 2026, 08:29 AM IST
Israel Elections : इस्रायलमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप, नेतन्याहू आणि लष्करप्रमुखांमध्ये खडाजंगी

सार

इस्रायलमध्ये निवडणुका तोंडावर असतानाच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि लष्करप्रमुख इयाल जमीर यांच्यात इराणवरील कारवाईवरून मोठा वाद सुरू असल्याची चर्चा आहे.

मुंबई : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि आयडीएफ (IDF) लष्करप्रमुख जनरल इयाल जमीर यांच्यात सध्या मोठा वाद सुरू असल्याचं इस्रायलच्या 'चॅनेल १२' ने म्हटलंय. जमीर यांनी एका लष्करी कारवाईला विरोध दर्शवला असून, त्यांनी यावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केल्याचं गुप्त सूत्रांनी वाहिनीला सांगितलंय. तसंच, या कारवाईसाठी नेतन्याहू यांच्याकडून कायदेशीर अधिकाराची स्वाक्षरी असलेली कागदपत्रंही त्यांनी मागितली आहेत. या सूचना नेमक्या काय होत्या हे वाहिनीने स्पष्ट केलं नसलं तरी, इराणवर नव्याने हल्ला करण्याबाबत हा वाद असल्याचा अंदाज आहे.

इस्रायलमध्ये मंगळवारी निवडणुका पार पडणार आहेत. पण त्याआधीच हा वाद चव्हाट्यावर आलाय. निवडणूक सर्वेक्षणांनुसार, नेतन्याहू आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गॅडी आयझेनकोट यांच्यात सध्या काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने चॅनेल १२ ने म्हटलंय की, "ही कारवाई इराणसोबतचा तणाव वाढवू शकते. सध्याची वेळ अत्यंत संवेदनशील असून, यामुळे मोठी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही." राजकीय नेतृत्व 'इराणच्या मुद्द्याचा राजकीय फायद्यासाठी वापर' करत असल्याची भीती लष्करी अधिकाऱ्यांमध्ये असल्याचंही काही सूत्रांनी सांगितलंय.

नेतन्याहू यांनी आरोप फेटाळले

पण, इस्रायलच्या 'चॅनेल १४' ला दिलेल्या मुलाखतीत नेतन्याहू यांनी हे सगळे आरोप 'बकवास' असल्याचं म्हटलंय, असं वृत्त 'टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलंय. याआधी एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना, आपण आयडीएफ आणि मोसादला इराणची राजवट उलथवून टाकण्यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्याचं इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं.

अमेरिकेचा पाठिंबा आणि निवडणुकीतील दावे

इस्रायल सरकारच्या सर्वोच्च पातळीवर हा वाद सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पुन्हा एकदा नेतन्याहू यांना पाठिंबा दिलाय. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर एक पोस्ट करत म्हटलंय की, "इस्रायलच्या जनतेसाठी आणि ज्यांनी हे पाहिलं नाही त्यांच्यासाठी, मी एका आठवड्यापूर्वी तुमचे पंतप्रधान बीबी नेतन्याहू यांना दिलेला पाठिंबा इथे जोडत आहे. शत्रूसह सर्वांनाच माहीत आहे की, बीबी आणि माझे संबंध खूप चांगले आहेत आणि आम्ही एकत्र अनेक विजय मिळवलेत. मी व्हेनेझुएलावर हल्ला केला, जी इतिहासातील सर्वात यशस्वी लष्करी कारवायांपैकी एक होती. पण त्याआधी, आम्ही 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' राबवलं, ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी समर्थक देशाला अण्वस्त्र मिळवण्यापासून आम्ही रोखलं. त्यानंतर आम्ही 'ऑपरेशन एपिक फ्युरी' केलं आणि आता इराणकडे नौदल नाही, हवाई दल नाही आणि त्यांचं लष्कर व अर्थव्यवस्था दोन्ही उद्ध्वस्त झालेत. इराणचा महागाई दर ३०१ टक्क्यांवर पोहोचलाय. नौदलाच्या नाकेबंदीमुळे त्यांना तेल मिळणं कठीण झालंय आणि त्यांचं लष्करी व इतर दोन स्तरांवरील नेतृत्वही संपलंय. जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल, तेव्हा लक्षात ठेवा की बीबी हे एक उत्कृष्ट योद्धे पंतप्रधान आहेत! काही अत्यंत दुष्ट लोकांनी इस्रायलला 'छोटा सैतान' आणि अमेरिकेला 'मोठा सैतान' म्हटलं होतं. आता जगात कुठेही 'डेथ टू अमेरिका, डेथ टू इस्रायल' अशा घोषणा ऐकू येणार नाहीत आणि तसं होणारही नाही. पंतप्रधानपदासाठी बीबी नेतन्याहू यांनाच मतदान करा, कारण आपण सुरू केलेलं काम आपल्याला पूर्ण करायचंय."

रविवारी, नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर तेल अवीवमधील अणुस्फोटाचं एक एआय-जनरेटेड (AI-generated) चित्र पोस्ट केलं. निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना त्यांनी जनतेला इशारा दिलाय की, त्यांच्याशिवाय इतर कोणालाही मतदान केल्यास इस्रायली जनतेला 'दुसऱ्या होलोकॉस्ट'च्या (Holocaust) धोक्याला सामोरं जावं लागू शकतं. उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते युवल ब्लूमबर्ग यांच्या विधानांचा संदर्भ देत नेतन्याहू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "इस्रायल देश सध्या खऱ्या आणि अस्तित्वाच्या धोक्यात आहे. जर इराणने अण्वस्त्रं मिळवली, तर काहीही पूर्वीसारखं राहणार नाही. इराण आणि शिया गटाच्या अस्तित्वाच्या धोक्यासमोर बाकी सर्व गोष्टी क्षुल्लक आहेत."

निवडणुकीचा अंदाज

या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, "इराणमधील काम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे ट्रम्प यांची आणखी दोन वर्षं आहेत. त्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही—कमला हॅरिस येतील की आणखी कोणी सामान्य नेता. येत्या काही वर्षांत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक काम पूर्ण करायला आपल्याकडे एवढाच वेळ उरलाय. राज्याची सर्व आवश्यक संसाधनं या मोहिमेत गुंतवली पाहिजेत... हे अशा पंतप्रधानाकडून शक्य नाही जो फोन उचलून ट्रम्प यांच्याशी सविस्तर आणि जवळीकतेने संवाद साधू शकत नाही."

२३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मंगळवारच्या निवडणुकीच्या अंतिम अंदाजानुसार, सध्याची आघाडी किंवा विरोधी गट यापैकी कोणालाही निवडणुकीनंतर सरकार स्थापन करता येणार नाही, अशी कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Turkey Kitten Rescue: मांजराच्या पिल्लाला वाचवताना तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
Brazil Train Accident: ब्राझीलमध्ये रेल्वे रुळावर पडलेल्या क्रेनला ट्रेनची धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ