
ब्राझीलमध्ये रेल्वे रुळावर पडलेल्या एका क्रेनला ट्रेनने धडक दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ट्रेनच्या धडकेनंतर क्रेनचे मोठे तुकडे थेट खालच्या रस्त्यावर कोसळले. हा रस्ता वाहने आणि पादचाऱ्यांच्या गर्दीने भरलेला होता.
ही घटना साओ पाउलो शहरात घडली. या भीषण अपघातात क्रेन ऑपरेटर जखमी झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, ट्रेन येण्यापूर्वीच क्रेन रुळांवर पडलेली होती. ट्रेनने क्रेनला इतक्या जोरात धडक दिली की, क्रेनचे तुकडे उडून थेट पुलाखालच्या रस्त्यावर पडले. त्यावेळी रस्त्यावर वाहने आणि लोकांची मोठी गर्दी होती.
जखमी क्रेन ऑपरेटरची प्रकृती सध्या कशी आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच, क्रेनचे तुकडे रस्त्यावर पडल्याने तिथे असलेल्या कोणा प्रवाशाला दुखापत झाली आहे की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
क्रेन नेमकी रुळांवर कशी पडली, यावर प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाईल, त्यानंतरच अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होईल.