NASA : अंतराळ स्थानकातील एकाची तब्येत बिघडली, क्रू-11 मोहीम लवकरच आवरती घेणार!

Published : Jan 09, 2026, 06:42 PM IST
NASA

सार

NASA : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील एका अंतराळवीराला आरोग्याची गंभीर समस्या उद्भवल्याचे नासाने म्हटले आहे. यामुळे क्रू-11 मोहीम लवकर संपवून चार सदस्यांच्या टीमला पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(NASA) वॉशिंग्टन : अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गतवर्षी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. 6 जून 2024 रोजी हे दोन अंतराळवीर या अंतराळ स्थानकात दाखल झाले होते. मात्र, तांत्रिक कारणाने ते माघारी परतू शकले नाहीत. सुमारे 9 महिन्यांनंतर स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून अंतराळातून पृथ्वीवर परतले. पण आता एका अंतराळवीराची तब्येत बिघडल्याने एक मोहीम मुदतीआधी स्थगित करून सर्व अंतराळवीरांना माघारी आणण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील एका अंतराळवीराला गंभीर आरोग्य समस्या असल्याचे नासाने म्हटले आहे. या समस्येमुळे क्रू-11 मोहीम लवकर संपवून चार सदस्यांच्या टीमला पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या अंतराळवीराला आरोग्याची समस्या आहे, हे नासाने उघड केलेले नाही. इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून अशाप्रकारे तातडीने परत आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

क्रू-11 टीममध्ये मिशन कमांडर नासाच्या सेना कार्डमन, मिशन पायलट नासाचे माईक फिन्के, मिशन स्पेशलिस्ट जपानच्या अंतराळ संस्था JAXA चे किमिया युवी आणि रशियन अंतराळ संस्था Roscosmos चे ओलेग प्लॅटोनोव्ह यांचा समावेश आहे. 8 जानेवारी रोजी सेना कार्डमन आणि माईक फिन्के यांनी स्पेस वॉकची योजना आखली होती. स्टेशनच्या पॉवर सिस्टीमची दुरुस्ती करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. मात्र, शेवटच्या क्षणी ते रद्द करण्यात आले. दोघांपैकी एकाला आरोग्याची समस्या आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्या व्यक्तीच्या सुरक्षेचा विचार करूनच क्रू-11 मोहीम लवकर संपवण्यात येत आहे.

पुढील 48 तासांत क्रू-11 च्या परत येण्याची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल. सेना की माईक, कोणाला आरोग्याची समस्या आहे हे नासाने उघड केलेले नाही. समस्या काय आहे हे देखील सांगितले जाणार नाही. पण ही घटना इतकी गंभीर आहे की, त्यामुळे मोहीम लवकर संपवावी लागत आहे. गरज पडल्यास, आणखी एक महिना स्टेशनवर राहून मोहीम पूर्ण करता आली असती, पण अंतराळवीराच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही, असा नासाचा निर्णय आहे.

साधारणपणे, नासाच्या क्रू मोहिमा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालतात. नवीन टीम आल्यानंतर आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतरच जुनी टीम परतते. क्रू-12 मोहिमेचे प्रक्षेपण सध्या फेब्रुवारीमध्ये नियोजित आहे. ते येण्यापूर्वीच क्रू-11 परत येत असल्याने, नोव्हेंबरमध्ये रशियाच्या सोयुझ एमएस-28 मोहिमेद्वारे स्टेशनवर पोहोचलेल्या तीन सदस्यांच्या टीमवर स्टेशनची संपूर्ण जबाबदारी असेल. या टीममध्ये दोन रशियन अंतराळवीर आणि नासाचा एक प्रतिनिधी आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Viral video: ट्रेनवरील बिबट्याचा हल्ला ते पुन्हा नोटबंदी; बातम्यांची सत्यता काय?
Minority Safety : पाकिस्तानात हिंदू तरुणाला गोळ्या झाडून जीवे मारले, तीव्र पडसाद