
US Military Buildup Middle East Sparks Iran Intervention Rumors : इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र होत असताना, अमेरिका मध्य पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत असल्याचे वृत्त आहे. अमेरिकन हवाई दलाची शक्तिशाली विमाने C5 आणि C17 ग्लोबमास्टर, तसेच हवेत इंधन भरणारी टँकर विमाने यूकेमधील प्रमुख हवाई तळांवर दाखल झाली आहेत. व्हेनेझुएलामध्ये निकोलस मदुरो यांना पकडण्यासाठी नेतृत्व करणाऱ्या 'नाईट स्टॅकर्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 160 व्या स्पेशल ऑपरेशन्स एव्हिएशन रेजिमेंटचाही यात समावेश असल्याच्या वृत्ताने चर्चांना उधाण आले आहे. यूकेमध्ये दाखल झालेल्या अमेरिकन सैनिकांना विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचेही म्हटले जात आहे. इराणमधील सुमारे शंभर शहरांमध्ये आर्थिक संकट आणि महागाईविरोधात लोक रस्त्यावर उतरले असताना अमेरिकेची ही हालचाल लक्षणीय आहे.
ब्रिटनमधील आरएएफ फेअरफोर्डसह इतर केंद्रांवर चिनूक, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि AC-130J घोस्टरायडर विमाने तैनात करण्यात आल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या रशियाशी संबंधित तेलवाहू जहाजे पकडण्यासाठी ही कारवाई असल्याचे काही रिपोर्ट्स असले तरी, इराणच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे पी-8 टेहळणी विमान दिसल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मानले जात आहे. तथापि, या हालचालींबाबत अमेरिकेने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अमेरिका इराणविरोधात थेट कारवाई करेल की नाही, याबाबतही स्पष्टता नाही.
दरम्यान, इराणमध्ये निदर्शने सुरू झाल्यापासून अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. निदर्शकांवर इराणी सुरक्षा दलांनी हल्ला केल्यास अमेरिका मदतीला येईल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले होते. 'लॉक्ड अँड लोडेड' (Locked and Loaded) असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या वक्तव्यामुळे आणि त्यानंतर मध्य पूर्वेकडे सुरू असलेल्या लष्करी हालचालींमुळे चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. अमेरिका इराणमध्ये सत्तापालट किंवा थेट लष्करी हस्तक्षेप करण्याच्या विचारात आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, अमेरिकेच्या लष्करी हालचालींच्या वृत्तानंतर इराणने आपली हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत केल्याचेही वृत्त आहे.