काळे गोळे प्रथम आढळल्यापासून शास्त्रज्ञांना कोडे पडले आहे.
सिडनी: समुद्रकिनाऱ्यांवर आढळलेल्या दुर्गंधीयुक्त काळ्या गोळ्यांमुळे चिंता वाढली आहे. अनेक ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यांवर हे गोळे आढळले आहेत. ते कुठून आले याचे कोडे अद्यापही शास्त्रज्ञांना सुटलेले नाही. काळे गोळे प्रथम आढळल्यापासून शास्त्रज्ञांना कोडे पडले आहे. सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यांवर हे गोळे दिसल्याने स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत.
न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील (यूएनएसडब्ल्यू) रसायनशास्त्राचे प्राध्यापक जॉन बेव्ह्स म्हणतात की, हे गोळे कुठून आले याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही. या रहस्यमय वस्तूंचा वास असह्य आहे. ते स्थानिक सांडपाणी व्यवस्थेतून आले आहेत का, होडीतून सोडले गेले आहेत का, गटारातून आले आहेत का हे अद्याप स्पष्ट नाही.
यामागे इतर काही कारणे आहेत का हे देखील स्पष्ट नाही, असे ते म्हणाले. १७ ऑक्टोबर रोजी बॉन्डी बीचसह आठ समुद्रकिनाऱ्यांवर हे गोळे आढळल्यानंतर न्यू साउथ वेल्स पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने त्यांना स्पर्श करू नये असा इशारा दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आढळलेल्या गोळ्यांमध्ये फॅटी अॅसिड, सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाणारे रसायने आणि स्वच्छतागृहातील रसायने आढळली आहेत. याशिवाय, ज्वलनास मदत करणारी तेले देखील या गोळ्यांमध्ये आढळली आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.