Fake AI Crocodile : सिंगापूरमध्ये मगरीचा खोटा AI फोटो व्हायरल करणं म्यानमारच्या तरुणाला भोवलं

Published : Oct 02, 2026, 03:49 PM IST
Fake AI Crocodile : सिंगापूरमध्ये मगरीचा खोटा AI फोटो व्हायरल करणं म्यानमारच्या तरुणाला भोवलं

सार

सिंगापूरमध्ये एका ३० वर्षीय म्यानमारच्या नागरिकाने मगरीचा खोटा AI फोटो शेअर केला. यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आणि जलाशयातील वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीज थांबवाव्या लागल्या. आता हा तरुण कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

मुंबई : मान्यमारचा एक ३० वर्षीय तरुण सिंगापूरमध्ये चांगलाच अडचणीत आला आहे. त्याने एका जलाशयात मगर असल्याचा खोटा AI फोटो तयार करून शेअर केला. यामुळे प्रशासनाला शोधमोहीम राबवावी लागली आणि पाण्यातील सर्व खेळ तात्पुरते थांबवावे लागले. CNA च्या रिपोर्टनुसार, ये लिन (Ye Lin) असं या तरुणाचं नाव असून, २९ सप्टेंबर रोजी त्याच्यावर खोटी माहिती पसरवणे आणि न्यायप्रक्रियेत अडथळा आणणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

न्यायालयात दुभाषियाच्या मदतीने हजर राहिल्यानंतर, ये लिनने आपला गुन्हा कबूल करणार असल्याचं सांगितलं. तसंच, आपण कोणताही वकील नेमणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

२० ऑगस्ट रोजी ये लिनने पांडन रिझर्व्हयर (Pandan Reservoir) मध्ये मगर असल्याचा एक AI फोटो तयार केला. हा फोटो त्याने त्याचा सहकारी मिन मिन ऊ (Min Min Oo) याला पाठवला. त्यानंतर, जलाशयात मगर दिसल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली.

या खोट्या माहितीमुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सिंगापूरची राष्ट्रीय जल संस्था 'पब्लिक युटिलिटीज बोर्ड' (PUB) आणि 'नॅशनल पार्क्स बोर्ड'ने मगरीला शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी जलाशयाच्या आजूबाजूला मोठी शोधमोहीम सुरू केली.

या घटनेमुळे परिसरातील मनोरंजनाचे कार्यक्रमही विस्कळीत झाले. सिंगापूर रोइंग असोसिएशन आणि सिंगापूर कॅनो फेडरेशनला जलाशयातील त्यांच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीज तात्पुरत्या थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी PUB च्या तपासात मगरीचा तो फोटो खोटा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर ही शोधमोहीम थांबवण्यात आली आणि पांडन रिझर्व्हयरमधील वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीज पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा ये लिनने २१ ऑगस्ट रोजी त्याच्या फोनमधील जेमिनी एआय (Gemini AI) अ‍ॅपमधून तो AI फोटो आणि लॉग हिस्ट्री डिलीट केली. पुरावे नष्ट केल्यामुळेच त्याच्यावर न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सिंगापूर पोलिसांनी एक कडक इशारा दिला आहे. जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं. अशा खोट्या दाव्यांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते आणि सरकारी यंत्रणांचा वेळ आणि पैसा विनाकारण वाया जातो, असंही प्रशासनाने म्हटलं आहे.

आता ये लिनला १० नोव्हेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.

खोटी माहिती पसरवल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास, त्याला तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, १०,००० सिंगापूर डॉलर्स (सुमारे ९.६ लाख रुपये) दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर, न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याच्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त सात वर्षांचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Beggars Salary : अमेरिकेत भीक मागणारे रोज किती कमवतात माहितीये? सॉफ्टवेअर इंजिनिअरपेक्षा जास्त?
Captain Smit Machchhar: कॅप्टन स्मित यांच्यावर हल्ला करणारा तो को-पायलट कोण? नाव का लपवलं जातंय?