Captain Smit Machchhar: कॅप्टन स्मित यांच्यावर हल्ला करणारा तो को-पायलट कोण? नाव का लपवलं जातंय?

vivek panmand   | CMS
Published : Oct 01, 2026, 08:50 PM IST
Captain Smit Machchhar: कॅप्टन स्मित यांच्यावर हल्ला करणारा तो को-पायलट कोण? नाव का लपवलं जातंय?

सार

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानात भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर को-पायलटने चाकूने हल्ला केला. तरीही त्यांनी १३७ प्रवाशांचे प्राण वाचवले. ओमानच्या या को-पायलटमागे दहशतवाद्यांचा हात आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश यूएईच्या ॲटर्नी जनरलनी दिले आहेत.

दुबई: दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात काल एक थरारक घटना घडली. या घटनेत १३७ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार सध्या जगभरात चर्चेत आहेत. स्वतःच्या को-पायलटनेच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. तरीही कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या धाडसाचं संपूर्ण जग (काही शत्रू देश सोडले तर) कौतुक करत आहे. जर कॅप्टन स्मित यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं, तर सर्व प्रवाशांना जीव गमवावा लागला असता. असं झालं असतं तर हा ९/११ सारखाच आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला ठरला असता, असं बोललं जात आहे.

एवढं सगळं होऊनही त्या को-पायलटचं नाव अजून का जाहीर केलं नाही, यावर आता मोठी चर्चा सुरू आहे. हा माणूस कोण आहे? त्याचं नाव काय? त्याचा नेमका हेतू काय होता? विमानात असलेल्या जास्तीत जास्त इस्रायली नागरिकांना मारण्याचा त्याचा प्लॅन का होता? या प्रश्नांची बरीचशी उत्तरे समोर आली असली, तरी अधिकृत माहिती मिळणं अजून बाकी आहे.

सध्या काय माहिती समोर आलीय?

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, हा को-पायलट ओमानचा नागरिक होता. ओमानचे इस्रायलसोबत कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत, एवढीच माहिती आतापर्यंत उघड झाली आहे. यामुळेच आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इस्रायलच्या मार्गांवर उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्यांची भरती प्रक्रिया तपासणे आणि सुरक्षेच्या नियमांचं काटेकोर पालन होतंय की नाही हे पाहणे, ही आता नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाची जबाबदारी बनली आहे.

चौकशीचे आदेश

दुसरीकडे, FZ1073 हे विमान सौदी अरेबियाच्या तबुकमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यापूर्वी जो काही प्रकार घडला, त्याच्या चौकशीचे आदेश यूएईच्या ॲटर्नी जनरलनी दिले आहेत. या घटनेमागची नेमकी कारणं आणि परिस्थिती शोधण्याचं काम तपास पथक करणार आहे. यात एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का किंवा हा आधीच ठरवलेला कट होता का, याचाही तपास केला जाईल. प्रवासादरम्यान विमानाच्या कॉकपिटमध्ये वाद झाला आणि त्यानंतर क्रू मेंबर्सना मध्यस्थी करून विमान सुरक्षित करावं लागलं, असं फ्लायदुबईने आपल्या निवेदनात म्हटलं होतं. याच आधारावर आता पुढचा तपास सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Delivery Robots: रशियात डिलिव्हरी रोबोट्समुळे ट्रॅफिक जॅम, व्हिडिओ व्हायरल
Dubai Delivery Rider: दुबईत भारतीय डिलिव्हरी बॉयचा सन्मान, रस्त्यावरील पाणी थांबवून जिंकली मनं