
Mexico Small Plane Crash Kills 7 Near Toluca Airport : मेक्सिकोमध्ये एक भीषण विमान अपघात झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सॅन माटेओ एटेंको परिसरात एक छोटे खासगी विमान कोसळले, ज्यात किमान ७ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात विमान इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना झाला. प्रश्न असा आहे की, विमानाला मार्गातच उतरण्याचा प्रयत्न करण्याची वेळ का आली?
ही दुर्घटना टोलुका विमानतळापासून फक्त तीन मैल (सुमारे ५ किलोमीटर) दूर एका औद्योगिक परिसरात झाली. हा परिसर मेक्सिको सिटीपासून सुमारे ५० किलोमीटर पश्चिमेला आहे. अपघातानंतर तिथे गोंधळ उडाला आणि आगीचे मोठे लोळ दूरवरून दिसत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे छोटे खासगी जेट मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील अकापुल्को येथून उड्डाण करून टोलुकाकडे जात होते. पण उड्डाणादरम्यान काही कारणास्तव विमानाला तांत्रिक किंवा इतर समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे पायलटने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. मेक्सिको स्टेट सिव्हिल प्रोटेक्शनचे समन्वयक एड्रियन हर्नांडेझ यांनी सांगितले की, पायलटने विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली.
हर्नांडेझ यांच्या मते, विमानाने फुटबॉलच्या मैदानावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. जर हे लँडिंग यशस्वी झाले असते, तर कदाचित अनेक जीव वाचले असते. पण दुर्दैवाने, विमान जवळच असलेल्या एका व्यावसायिक युनिटच्या धातूच्या छतावर आदळले. या धडकेनंतर मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. पाहता पाहता संपूर्ण परिसर धूर आणि आगीच्या विळख्यात सापडला.
सॅन माटेओ एटेंकोच्या महापौर अॅना मुनिझ यांनी सांगितले की, आग खूप वेगाने पसरत होती. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने कारवाई करत सुमारे १३० लोकांना परिसरातून सुरक्षित बाहेर काढले. औद्योगिक परिसर असल्याने आग आणखी धोकादायक होऊ शकली असती, त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या खासगी जेटमध्ये ८ प्रवासी आणि २ क्रू सदस्य, म्हणजेच एकूण १० लोक नोंदणीकृत होते. पण अपघातानंतर अनेक तासांनंतरही फक्त ७ मृतदेहच सापडले. उर्वरित लोक कुठे आहेत, हा प्रश्न अजूनही कायम आहे. ते आगीत पूर्णपणे जळाले की अपघातापूर्वी बाहेर पडू शकले, याचा तपास सुरू आहे.
सध्या या विमान अपघाताचा तपास सुरू आहे. अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड, हवामान की मानवी चूक होती, याचा शोध अधिकारी घेत आहेत. मेक्सिकोमधील हा अपघात पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण करतो की, छोट्या खासगी विमानांची सुरक्षा किती मजबूत आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा पूर्णपणे विश्वासार्ह आहे का हेही बघावे लागेल.