
Mecca Madinah Bus Accident : सौदी अरेबियामध्ये सोमवारी पहाटे एक भीषण अपघात झाला, ज्यात हैदराबादेतील किमान ४२ उमराह यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता मक्काहून मदिनेला जाणाऱ्या प्रवासी बस आणि डिझेल टँकरमध्ये जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात मुफरिहत परिसरात झाला. बसमध्ये सुमारे २० महिला आणि ११ मुलांचा समावेश होता, असे सांगितले जात आहे. सर्व प्रवासी उमराह करून मदिनेकडे जात होते. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. स्थानिक सूत्रांनुसार, ४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत आकड्याला दुजोरा दिलेला नाही. अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे, ज्यांचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
तेलंगणामधील बस अपघातांच्या घटना ताज्या असतानाच, आता परदेशातही बस अपघात झाला आहे. पवित्र मक्का आणि इतर ठिकाणांना भेट देण्यासाठी भारतातून सौदी अरेबियाला गेलेल्या यात्रेकरूंवर ही वेळ ओढवली. हैदराबादमधील अनेक मुस्लिम कुटुंबं या यात्रेत सहभागी झाली होती. काल मध्यरात्री सौदी अरेबियात झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सौदी अरेबियातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश हैदराबादी आहेत. हैदराबादच्या मल्लेपल्ली भागातील 16 ते 18 जणांचा या बस अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी त्यांना सौदीला नेल्याचे समजते. या अपघातात मक्का यात्रेला गेलेले आपले कोणी नातेवाईक आहेत का, या चिंतेने अनेकजण घाबरले आहेत. पण त्यांच्याकडे पुरेशी माहिती नाही. त्यामुळे राज्य सरकारने विशेष कंट्रोल रूम सुरू केले आहेत आणि फोन नंबर जाहीर केले आहेत.
तेलंगणा सचिवालय कंट्रोल रूम नंबर 79979 59754, 99129 19545 वर फोन करून सौदी अरेबियातील अपघाताची माहिती मिळवू शकता. पीडित कुटुंबे मदत आणि सहकार्य मिळवू शकतात.
नवी दिल्लीतील तेलंगणा भवनातही तेलंगणा अधिकाऱ्यांनी कंट्रोल रूम सुरू केला आहे. सौदी अपघाताच्या माहितीसाठी पीडित कुटुंबे या फोन नंबरवरही संपर्क साधू शकतात.
भारतातून अनेक मुस्लिम बांधव पवित्र मक्का आणि मदिना दर्शनासाठी सौदी अरेबियाला जातात. नुकतेच काही जण अशाच आध्यात्मिक यात्रेवर गेले होते. मक्का दर्शन करून मदिनाकडे जात असताना एक अनपेक्षित घटना घडली. बद्र-मदिना दरम्यान मुफरहात परिसरात भारतीय यात्रेकरूंच्या बसला अपघात झाला. बसने एका डिझेल टँकरला धडक दिल्याने मोठा स्फोट झाला. यात बसमधील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातावेळी बसमध्ये एकूण 42 जण होते, ज्यात 20 महिला आणि 11 मुलांचा समावेश होता. मृतांमध्ये बहुतांश हैदराबादी असल्याची माहिती आहे, मात्र अद्याप संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.
सौदी अरेबियातील बस अपघातात हैदराबादी नागरिकांच्या मृत्यूबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुख्य सचिव आणि डीजीपी यांना संपूर्ण माहिती घेण्याचे निर्देश दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि सौदीतील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा करून, मृतांमध्ये तेलंगणातील किती लोक आहेत हे निश्चित करण्यास सांगितले आहे. यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर, मुख्य सचिव रामकृष्णा राव यांनी दिल्लीतील समन्वय सचिव गौरव उप्पल यांना सतर्क केले. अपघातात तेलंगणातील किती लोक आहेत, याची माहिती घेऊन त्यांचे संपूर्ण तपशील तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सौदीतील दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे.
सौदीमध्ये झालेल्या बस अपघातात आंध्र प्रदेशातील कोणी आहे का, याची माहिती सरकार घेत आहे. तात्काळ उच्च अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. जेद्दा येथील कॉन्सुल जनरल आणि रियाधमधील उप-राजदूतांशी संपर्क साधला जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून संपूर्ण तपशील देण्याचे आदेश दिल्लीतील निवासी आयुक्त आणि समन्वय सचिवांना देण्यात आले आहेत.