
चंदीगड: गुरुनानक देव यांच्या प्रकाश पर्वासाठी पाकिस्तानला गेलेल्या यात्रेकरूंच्या गटातून बेपत्ता झालेली एक भारतीय शीख महिला इस्लाम धर्म स्वीकारून पाकिस्तानातील एका व्यक्तीशी विवाहबद्ध झाल्याचे कागदपत्रांमधून समोर आले आहे.
पंजाबच्या कपूरथला येथील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय सरबजीत कौर यांच्याबद्दल ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठीच्या द्विपक्षीय करारानुसार, ४ नोव्हेंबर रोजी यात्रेकरूंचा एक गट वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाला होता. यावर्षी गुरुनानक देव यांची ५५५ वी जयंती होती. पाकिस्तानात सुमारे १० दिवस घालवल्यानंतर, १,९९२ शीख यात्रेकरूंचा गट १३ नोव्हेंबर रोजी भारतात परतला. मात्र, या गटात सरबजीत कौर नव्हत्या.
आता समोर आलेल्या 'निकाहनामा' (इस्लामिक विवाह करार) नावाच्या उर्दू कागदपत्रानुसार, कौर यांनी लाहोरपासून सुमारे ५६ किमी अंतरावर असलेल्या शेखूपुरा येथील रहिवासी नासिर हुसेन यांच्याशी लग्न केले आहे. लग्नापूर्वी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून 'नूर' ठेवले, असे या अपुष्ट कागदपत्रात म्हटले आहे, असं एनडीटीव्हीने (NDTV) वृत्त दिलं आहे. सरबजीत यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. सुमारे ३० वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहणारे करनैल सिंग हे त्यांचे पती होते. त्यांना दोन मुलेही आहेत.
सरबजीत कौर यांचा पासपोर्ट पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातून जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडल्याच्या किंवा भारतात प्रवेश केल्याच्या इमिग्रेशन रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नसल्यामुळे, त्या पाकिस्तानात बेपत्ता झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. सरबजीत कौर भारतात परत न आल्याने, येथील इमिग्रेशन विभागाने तातडीने पंजाब पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक अहवाल इतर भारतीय एजन्सींनाही पाठवला आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत भारतीय मिशन पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असे वृत्तसंस्था आयएएनएसने (IANS) सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
शिखांची सर्वोच्च संस्था, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती, दरवर्षी ऐतिहासिक गुरुद्वारांना, विशेषतः गुरुनानक यांच्या प्रकाश पर्वाच्या दिवशी भेट देण्यासाठी यात्रेकरूंचे शिष्टमंडळ पाकिस्तानात पाठवते. सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासाची परवानगी नाकारल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी, सरकारने गेल्या महिन्यात शीख भाविकांना सीमेपलीकडील ननकाना साहिब येथे १० दिवसांच्या तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दिली होती.