वेजिटेरियन असलेल्या या तरुणाला बिलावर चिकन बर्गर पाहून मानसिक त्रास झाला आणि त्यामुळे त्याने दोन लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
बिलिंगमध्ये चूक झाल्यामुळे मॅकडोनाल्ड्सविरुद्ध ३३ वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली आहे. ही घटना बेंगळुरू येथे घडली. मॅकडोनाल्ड्सने त्याला दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत तरुणाने न्यायालयात धाव घेतली.
तरुणाने फ्रेंच फ्राईजची ऑर्डर दिली होती. मात्र, बिलावर चिकन बर्गरची नोंद होती. वेजिटेरियन असलेल्या या तरुणाला बिलावर चिकन बर्गर पाहून मानसिक त्रास झाला आणि त्यामुळे त्याने दोन लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना लिडो मॉलमधील मॅकडोनाल्ड्सच्या आउटलेटमध्ये घडली. तक्रारदार आणि त्याचा जावई यांनी फ्रेंच फ्राईजची ऑर्डर दिली होती. मात्र, बिलावर मॅकफ्राईड चिकन बर्गर (एमएफसी) असे लिहिले होते. त्याची किंमतही जास्त होती. त्यावेळीच त्यांनी चूक दुरुस्त केली आणि दिलगिरी व्यक्त करून १०० रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याची तयारी दर्शवली.
मात्र, मॅकडोनाल्ड्सकडून अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त करावी, अशी तरुणाची मागणी होती. ती मिळाली नाही म्हणून तरुणाने तक्रार पुढे नेली. पोलिस तक्रार, मॅकडोनाल्ड्सला ईमेल, बंगळुरू अर्बन II अॅडिशनल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार असे सर्व काही तरुणाने केले.
मात्र, तरुणाची तक्रार फेटाळण्यात आली. तरुणाला फ्रेंच फ्राईजच देण्यात आले होते. त्यामुळे वेजिटेरियन असलेल्या तरुणाला काहीही त्रास झाला नाही. शिवाय, छोटीशी चूक झाली होती. ती त्यावेळीच दुरुस्त करण्यात आली होती, असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.