साउथ कॅरोलिना येथील यु शांग फूड प्रॉडक्ट्स कंपनीचे ३२००० किलोपेक्षा जास्त रेडी टू ईट मांसाहारी पदार्थ परत मागवण्यात आले आहेत. हे मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने एका बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कॅलिफोर्निया: अमेरिकेत लिस्टेरियाचा संसर्ग पसरत आहे. या संसर्गामुळे जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर, डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन सेंटरने (CDC) जागरूकतेचा इशारा दिला आहे. संसर्गास कारणीभूत असल्याचे मानले जाणारे यु शांग फूड प्रॉडक्ट्स कंपनीचे रेडी टू ईट मांसाहारी पदार्थ यूएस फूड सेफ्टी डिपार्टमेंटने परत मागवले आहेत. कॅलिफोर्नियात मृत्यूमुखी पडलेल्या बाळाची आई देखील या संसर्गामुळे उपचार घेत आहे. ती सध्या गर्भवती आहे. आतापर्यंत ११ जणांना हा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.
साउथ कॅरोलिना येथील यु शांग फूड प्रॉडक्ट्स कंपनीचे ३२००० किलोपेक्षा जास्त रेडी टू ईट मांसाहारी पदार्थ परत मागवण्यात आले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी या उत्पादकांच्या पदार्थांमध्ये लिस्टेरियाचा संसर्ग आढळून आला. सात जण कॅलिफोर्नियात, दोन जण इलिनॉय मध्ये, दोन जण न्यूयॉर्कमध्ये आणि एक जण न्यू जर्सीमध्ये असे एकूण ११ जणांनी या संसर्गामुळे उपचार घेतले आहेत. अमेरिकेतील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेने म्हटल्यानुसार, या राज्यांमध्येच हा संसर्ग मर्यादित राहण्याची शक्यता नाही आणि अधिक लोकांना हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
संसर्ग झाल्यास तीन ते चार आठवड्यांमध्ये तो ओळखता येतो. काही लोकांमध्ये उपचार न करताही हा संसर्ग बरा होऊ शकतो. वृद्ध आणि लहान मुलांना हा बॅक्टेरियल संसर्ग लवकर होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. हा संसर्ग मृत्यूचे कारणही बनू शकतो. या संसर्गामुळे तीव्र ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, मानेत अकड़णे, शरीराचा तोल जाणे, जुलाब, आणि पोटाचे विकार होऊ शकतात.
अमेरिकेतील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेनुसार, लिस्टेरिया संसर्ग हा देशातील मृत्यूचे तिसरे सर्वात मोठे कारण आहे. दरवर्षी १६०० हून अधिक लोक या संसर्गाला बळी पडतात. यापैकी २०० हून अधिक लोकांचा मृत्यू या संसर्गामुळे होतो.