
Keir Starmer Pulls UK Out of Potential Iran War : पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर इराणनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात युद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच अमेरिकेने आपल्या मित्र देशांना मदतीचं आवाहन केलं, पण ब्रिटनने या युद्धात उतरण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'आपला देश कोणत्याही आक्रमक परदेशी युद्धात सैन्य पाठवणार नाही'.
अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी मोहिमेदरम्यान संपूर्ण जगाचं लक्ष ब्रिटनकडे लागलं होतं, कारण ब्रिटन हा अमेरिकेचा जुना आणि जवळचा मित्र मानला जातो. पण पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी 'हा संघर्ष ब्रिटनची लढाई नाही' असं ठणकावून सांगितलं आहे.
त्यांनी म्हटलं की, सरकार असा कोणताही निर्णय घेणार नाही ज्यामुळे देशाच्या सैन्याला विनाकारण धोक्यात टाकलं जाईल. ब्रिटनसाठी आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय हित सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे सध्या तरी ब्रिटन या युद्धात थेट सहभागी होणार नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटोमधील काही देशांकडून ब्रिटनवर या संघर्षात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात होता. अमेरिकेलाही वाटत होतं की त्यांचे जवळचे मित्र या लष्करी मोहिमेत त्यांच्यासोबत उभे राहावेत. असं असूनही, पंतप्रधान स्टार्मर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी स्पष्ट केलं की, ब्रिटन अशा कोणत्याही आक्रमक लष्करी मोहिमेत सामील होणार नाही, ज्यामुळे प्रदेशातील तणाव आणखी वाढेल.
मात्र, ब्रिटनने या प्रकरणातून स्वतःला पूर्णपणे वेगळंही केलेलं नाही. पंतप्रधान स्टार्मर म्हणाले की, त्यांचा देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चांमध्ये सहभागी होईल. विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीला (Strait of Hormuz) सुरक्षित आणि खुलं ठेवण्याच्या मुद्द्यावर ब्रिटन सक्रिय राहील. हा सागरी मार्ग जगाच्या तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि येथील कोणत्याही अडथळ्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
ब्रिटन सरकारने अमेरिकेला सायप्रसमधील आपल्या 'आरएएफ अक्रोतिरी' (RAF Akrotiri) या लष्करी तळाच्या मर्यादित वापरासाठी परवानगी दिली आहे. पण यासाठी कडक नियम ठेवले आहेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की या तळाचा वापर फक्त बचावात्मक कामांसाठीच केला जाऊ शकतो. म्हणजेच, जर मिसाइल किंवा ड्रोन हल्ला रोखायचा असेल तरच याचा वापर करता येईल, पण कोणत्याही आक्रमक कारवाईसाठी याची परवानगी नसेल. अलीकडेच रॉयल एअर फोर्सने आखाती प्रदेशात मित्र देशांना मदत करताना काही इराणी ड्रोन पाडले होते.
ब्रिटनच्या या निर्णयामुळे अमेरिकेत नाराजी पसरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, ब्रिटनची ही भूमिका दोन्ही देशांच्या जुन्या आणि खास संबंधांसाठी चांगली नाही. त्यांच्या मते, अशा वेळी मित्र देशांनी एकत्र येऊन काम करायला हवं होतं.
तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनचा हा निर्णय फक्त राजकीय नाही, तर त्यामागे आर्थिक कारणंही आहेत. जर हे युद्ध आणखी वाढलं आणि सुएझ कालवा किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीसारखे महत्त्वाचे सागरी मार्ग बंद झाले, तर तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पंतप्रधान स्टार्मर यांनी युद्धात उतरण्याऐवजी देशाची सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेला प्राधान्य दिलं आहे.