दुबई: आयसीसी कसोटी फलंदाजी रँकिंगमध्ये इंग्लंडचा जो रूट पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ सहकारी हॅरी ब्रूकला मागे टाकत रूटने एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात गोल्डन डक आणि दुसऱ्या डावात एका धावेवर बाद झाल्याने हॅरी ब्रूकला अव्वल स्थान गमवावे लागले. नवीन रँकिंगमध्ये ब्रूक दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या केन विल्यमसनने तिसरे स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चमक दाखवू शकला नसला तरी भारताचा यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर आहे.
भारताविरुद्ध शतक झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडलाही रँकिंगमध्ये फारशी प्रगती झालेली नाही. नवीन रँकिंगमध्येही हेड पाचव्या स्थानावर आहे. कामिंदू मेंडिस, टेम्बा बावुमा, डॅरिल मिचेल यांच्यानंतर नवव्या स्थानावर असलेला ऋषभ पंत हा पहिल्या दहामधील दुसरा भारतीय फलंदाज आहे. विराट कोहली २० व्या स्थानावर कायम असताना, भारताविरुद्ध शतक झळकावणारा स्टीव्ह स्मिथ ११ व्या स्थानावर आहे. रोहित शर्मा एक स्थान वर येऊन ३० व्या स्थानावर पोहोचला आहे, तर शुभमन गिल एका स्थानाने सुधारत १६ व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांसह चमक दाखवणारा के एल राहुल ५० व्या स्थानावर आहे.
आयसीसी कसोटी गोलंदाजी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर मॅट हेन्री दोन स्थानांनी सुधारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा गस अॅटकिन्सन तीन स्थानांनी सुधारत १४ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर कसोटीतून निवृत्तीची घोषणा करणारा आर अश्विन पाचव्या आणि रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावर आहेत.