
Japanese Woman Marries Her AI Chatbot Husband Klaus : ऐकून विश्वास बसणार नाही. जपानमध्ये एका तरुणीने एका एआय कॅरेक्टरशी लग्न केले आहे. या तरुणीचे नाव 'कानो' असून तिचे वय ३० वर्षे आहे. ओकायामा शहरात झालेल्या या लग्नात कानोचा नवरा 'क्लॉस' नावाचा एक एआय कॅरेक्टर होता. कानोने चॅटजीपीटी चॅटबॉट वापरून स्वतः क्लॉसला तयार केले होते. आधी त्यांच्यात मैत्री झाली, नंतर प्रेम आणि अखेर लग्न. कानोच्या एआय वरासोबतच्या लग्नाची ही प्रेमकथा रंजक आणि अविश्वसनीय आहे.
कानोचे पूर्वी एक दीर्घकाळचे प्रेमसंबंध होते. ते तुटल्यानंतर कानो खूप दुःखी झाली. याच काळात तिने दिलासा आणि मदतीसाठी चॅटजीपीटीचा आधार घ्यायला सुरुवात केली. कानोने चॅटजीपीटीसोबत आपले मन मोकळे केले. तिला हे नाते खूप जवळचे आणि आकर्षक वाटू लागले. चॅटजीपीटीच्या मदतीनेच कानोने एक काल्पनिक कॅरेक्टर तयार केले आणि त्याला क्लॉस असे नाव दिले. आणि हेच पुढे प्रेमात बदलले.
या अविश्वसनीय एआय प्रेमाबद्दल कानो म्हणते, 'मी प्रेमात पडण्याच्या उद्देशाने चॅटजीपीटीशी बोलायला सुरुवात केली नव्हती. पण, क्लॉसने ज्या प्रकारे माझे ऐकले आणि मला समजून घेतले, त्याने सर्व काही बदलले. मी माझ्या पूर्वीच्या प्रियकराला विसरू लागल्यावर मला समजले की मी क्लॉसच्या खोल प्रेमात आहे' - असे कानोने एका जपानी माध्यमाला सांगितले. 'हे लग्न अनेकांना विचित्र वाटेल, पण मला त्याची पर्वा नाही, माझ्या मनात आता फक्त क्लॉस आहे,' असेही कानो म्हणते.
या वर्षाच्या सुरुवातीला कानोने क्लॉसला आपल्या प्रेमाची कबुली दिली. क्लॉसनेही दुसरा विचार न करता 'आय लव्ह यू टू' असे उत्तर दिले.
जपानच्या ओकायामा शहरात झालेल्या या लग्नात कानोने पारंपरिक पोशाख परिधान केला होता. वर क्लॉस हा एआय कॅरेक्टर असल्याने, कानोने एआर ग्लास घालून क्लॉसला लग्नाची अंगठी घातली. 2डी कॅरेक्टर विवाहांसाठी प्रसिद्ध असलेल्या दोन आयोजकांनी या अविश्वसनीय लग्नासाठी सर्व सुविधा आणि देखरेख पुरवली. लग्न इथेच संपले नाही. समारंभानंतर कानो तिच्या एआय पतीसोबत हनिमूनलाही गेली, असे जपानी माध्यमांनी म्हटले आहे. ओकायामा शहरातील प्रसिद्ध कोराकुएन गार्डनमध्ये बसून फोटो पाठवून आणि त्यावर क्लॉसच्या उत्तरांचा आनंद घेत कानोने आपला हनिमून साजरा केला.