Israel Iran War : ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर B-2 बॉम्बर्सनी अशी नष्ट केली इराणची अण्वस्र ठिकाणे, आता मोठे युद्ध पेटणार?

Published : Jun 22, 2025, 02:46 PM ISTUpdated : Jun 22, 2025, 02:47 PM IST
Israel Iran War : ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर B-2 बॉम्बर्सनी अशी नष्ट केली इराणची अण्वस्र ठिकाणे, आता मोठे युद्ध पेटणार?

सार

ट्रम्प यांनी लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर दोन दिवसांनी, अमेरिकेने बी-२ बॉम्बर्सचा वापर करून इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळे नष्ट केली. या हल्ल्यामुळे अमेरिका थेट इस्रायल-इराण संघर्षात सामील झाली, ज्यामुळे प्रादेशिक तणाव वाढला.

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "दोन आठवड्यांत इराणवर हल्ला करू" अशी चेतावणी दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत अमेरिकेने इराणमधील तीन अत्यंत महत्त्वाच्या अणुउर्जा केंद्रांवर हवाई हल्ला करून ती ठिकाणे नष्ट केली आहेत. या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात व्यापक अस्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे.

व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांची घोषणा

व्हाइट हाऊसमधून केलेल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, "इराणच्या अणुउर्जा कार्यक्रमाची पायाभूत रचना आणि जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या देशाची अण्वस्त्र निर्माण करण्याची क्षमता नष्ट करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट होते."

ट्रम्प पुढे म्हणाले, "आज रात्री मी जगाला सांगू शकतो की आमच्या हल्ल्यांना लक्षणीय यश मिळाले आहे. इराणची प्रमुख युरेनियम संवर्धन केंद्रे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आली आहेत." या हल्ल्यात फोर्डो (Fordow), नतांझ (Natanz) आणि इस्फहान (Isfahan) येथील अणुकेंद्रे लक्ष्य करण्यात आली.

बी-2 स्पिरिट बॉम्बर्सचा वापर

या मोहिमेत अमेरिका आपल्या प्रगत बी-2 स्पिरिट बॉम्बर्सचा वापर केला. 21 जून रोजी मिसुरी येथील व्हाईटमन एअरबेसवरून उड्डाण घेऊन बी-2 बॉम्बर्सने सुमारे १८,००० किलोमीटरचा प्रवास केला आणि इराणच्या हद्दीत घुसून कुठलाही रडार ट्रॅकिंग न होता अचूक हल्ले केले.

बी-2 स्पिरिट बॉम्बरचे वैशिष्ट्य

बी-2 स्पिरिट हे अमेरिकी वायुदलाचे सर्वाधिक प्रगत आणि अत्यंत गुप्ततेने ऑपरेट करणारे बॉम्बर आहे. हे विमान ३०,००० पाउंड क्षमतेचे GBU-57 'Massive Ordnance Penetrator' म्हणजेच 'बंकर बस्टर' बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. त्याचे वजन १,६०,००० पाउंड असून १७२ फूट पंखांची लांबी आहे. हे विमान दोन वैमानिक चालवतात आणि दोन GBU-57 बॉम्ब वाहून नेऊ शकते. एक बी-2 विमान सुमारे २ अब्ज डॉलर्स इतक्या प्रचंड खर्चाचे आहे.

इतिहासातील बी-2 बॉम्बर्सचा वापर

बी-2 बॉम्बर्सचा वापर यापूर्वीही अमेरिकेने अनेक युद्धांमध्ये केला आहे:

ऑक्टोबर २०२४: इराण समर्थित हूथी बंडखोरांवर यमनमध्ये हल्ला.

२००१: 9/11 नंतर 'ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडम' अंतर्गत अफगाणिस्तानमध्ये हल्ला.

१९९९: 'ऑपरेशन अलाइड फोर्स' अंतर्गत युगोस्लाव्हियामध्ये ८ आठवड्यांत ३३% सर्बियन लक्ष्य नष्ट.

२००३: 'ऑपरेशन इराकी फ्रीडम' मध्ये एकूण ४९ sorties पूर्ण.

२००७: सिरते, लिबियामध्ये इस्लामिक स्टेट आणि अल-कायदावर हल्ला.

इस्रायलने आधीच केली होती कारवाई

१३ जून रोजी इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब निर्मिती जवळपास पूर्ण नष्ट केल्याचा दावा करत एकतर्फी प्री-एम्प्टिव्ह स्ट्राइक केला होता. त्यानंतरच्या दिवसांमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये मिसाईल हल्ले आणि प्रत्युत्तरादाखल कारवाया सुरू झाल्या होत्या.

४०० नागरिकांचा मृत्यू

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, इराणमध्ये या हल्ल्यांमुळे ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ३,५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये झालेल्या इराणी प्रत्युत्तर हल्ल्यांमध्ये किमान १४ नागरिक मृत्युमुखी पडले असून १,२०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता

या संघर्षामुळे पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुउर्जा प्रकल्पांविरोधात थेट कारवाई सुरू केल्यामुळे याचा परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेतील राजकीय आणि सुरक्षा समतोलावर होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई केवळ अमेरिकेच्या सामरिक क्षमतेचे प्रात्यक्षिक नसून, एक जागतिक शक्ती म्हणून इराणच्या अणू कार्यक्रमाविरोधातील स्पष्ट संदेश आहे. परंतु या युद्धजन्य कारवायांचे दुष्परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागत असून आंतरराष्ट्रीय समुदायाने शांततेसाठी तातडीने हस्तक्षेप करावा, ही काळाची गरज आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे मदतीची याचना, पती भारतात करतोय दुसरे लग्न!
बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)