
तेहरान/जेरूसलेम : इस्रायल आणि इराणमध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त काळ युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. दरम्यान, २० जून रोजी इराणमध्ये भूकंप झाला. या घटनेमुळे इराणने न्यूक्लियर चाचणी केली असावी का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शुक्रवारी उत्तर इराणमधील सेमनान क्षेत्रात भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.१ होती. तस्नीम न्यूज एजन्सीनुसार, भूकंप सेमनानपासून २७ किलोमीटर दक्षिण-पश्चिमेस झाला. भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला.
इराणमधील भूकंपानंतर तेहरानने परमाणू हत्यारांची चाचणी केली आहे का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परमाणू चाचणी केल्यास स्फोटाच्या ठिकाणी भूकंप होतो. भूकंपाबाबत चिंता यासाठीही व्यक्त होत आहे कारण तो इराणच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र परिसराच्या जवळ आला. इराणच्या सैन्याद्वारे चालवले जाणारे सेमनान अंतराळ केंद्र आणि सेमनान क्षेपणास्त्र परिसर येथेच आहेत असे म्हटले जाते.
हा भूकंप इस्रायल आणि इराणमधील संघर्षादरम्यान आला आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा आज नववा दिवस आहे. इराण आणि इस्रायलने शनिवारी पुन्हा एकमेकांवर हल्ले केले.
इराणमध्ये भूकंप होणे ही काही नवीन गोष्ट नाही. येथे भूकंप होत राहतात. हा देश जगातील सर्वात भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. तो अल्पाइन-हिमालयीन भूकंप पट्ट्यावर वसलेला आहे. या क्षेत्रात अरब आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. इराणमध्ये दरवर्षी साधारणपणे २,१०० भूकंप होतात. त्यापैकी १५ ते १६ भूकंपांची तीव्रता ५.० किंवा त्याहून अधिक असते. २००६ ते २०१५ दरम्यान इराणमध्ये ९६,००० भूकंप झाले.
परमाणु क्रियाकलापांमध्ये जमिनीखाली स्फोट झाल्यास भूकंप होऊ शकतो. भूकंपतज्ज्ञ भूकंपीय लहरींचा अभ्यास करून स्फोट आणि नैसर्गिक भूकंप यातील फरक ओळखू शकतात. इराणच्या भूकंपीय डेटावरून असे दिसून येते की भूकंप ही एक नैसर्गिक घटना होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, यूएस जियोलॉजिकल सर्वे (USGS) आणि कॉम्प्रिहेंसिव्ह न्यूक्लियर-टेस्ट-बॅन ट्रीटी ऑर्गनायझेशन (CTBTO) आणि स्वतंत्र भूकंपतज्ञांनी केलेल्या विश्लेषणाने परमाणु चाचण्या किंवा लष्करी कारणांमुळे झालेल्या भूकंपाच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
इस्रायलने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या कुद्स फोर्सचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद सईद इजादी याला ठार मारल्याचा दावा केला आहे. इजादीवर इराणच्या कोम शहरातील एका अपार्टमेंटवर हल्ला करून टार्गेट करण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिली आहे. मात्र, इराणकडून अद्याप या घटनेबाबत अधिकृत पुष्टि झालेली नाही.
मोहम्मद सईद इजादी हा इराणच्या कुद्स फोर्सचा कमांडर होता. कुद्स फोर्स ही IRGC ची परदेशी गुप्त मोहिमांकरिता कार्यरत असणारी शाखा असून, तिच्या माध्यमातून इराण सीरियामधील, इराकमधील, गाझामधील व इतर देशांतील दहशतवादी किंवा सशस्त्र गटांशी संबंध ठेवतो. इजादीला हमास आणि इराण यांच्यातील मुख्य संपर्क सूत्र मानले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इजादी कोम शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता, आणि तेथील टार्गेटेड स्ट्राइकमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचा दावा आहे. या घटनेनंतर इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या कारवाईवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालं आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हमासच्या अचानक हल्ल्यात १२०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या इस्रायलच्या गाझामधील कारवाईत हजारो जणांचा बळी गेला असून, परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे.
इस्रायलचा आरोप आहे की, मोहम्मद सईद इजादी यानेच त्या हल्ल्यात हमासला मदत केली होती, समन्वय साधला होता आणि रणनीती आखण्यातही सहभागी होता. त्यामुळेच इजादी इस्रायलच्या रडारवर आला होता.
गाझा आणि लेबनान नंतर आता हा संघर्ष थेट इराणच्या अंतर्गत भूभागात पोहचल्याचे स्पष्ट संकेत या कारवाईमधून मिळत आहेत. यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यात थेट संघर्ष उद्भवण्याची शक्यता अधिक प्रबळ झाली आहे.
इराणकडून या हल्ल्याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्यापपर्यंत आलेली नाही. मात्र, जर इस्रायलचा दावा खरा ठरला, तर याचे परिणाम पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर जाणवतील, असे जाणकारांचे मत आहे.