
इराण आणि इस्त्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची भूमिका गोंधळात टाकणारी ठरली आहे. युद्धाच्या सुरुवातीस इराणसोबत उभे राहण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने आता मात्र पवित्रा बदलला असून, आपली अणुशस्त्रविषयक भूमिका स्पष्ट करत इराणच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे.
सुरुवातीला पाकिस्तानचा इराणला पाठिंबा
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना ठामपणे सांगितले होते की, इस्रायलने इराण, येमेन आणि पॅलेस्टाईनला लक्ष्य केले आहे. जर मुस्लिम देश आता एकत्र आले नाहीत, तर सर्वांचे भवितव्य असुरक्षित राहील. त्यांनी मुस्लिम देशांनी इस्रायलविरुद्ध एकत्र यावे आणि राजनैतिक संबंध तोडावेत असे आवाहनही केले होते.त्याचबरोबर, इस्लामाबाद इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असेही त्यांनी ठासून सांगितले. IRGC कमांडर जनरल मोहसेन रेझाई यांनीही दावा केला की, “जर इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब टाकला, तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल,” असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
पण नंतर पाकिस्तानची भूमिका बदलली
इराणकडून अशा प्रकारचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय माध्यमांत झळकल्यानंतर पाकिस्तानने मात्र आपली भूमिका बदलली. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीच यावर प्रतिक्रिया देत सांगितले की, “इस्लामाबादने इस्रायलवर अणुहल्ल्याचे कोणतेही विधान केलेले नाही.आमचा तसा कोणताही हेतू नाही.”त्यांनी अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, “पाकिस्तान एक जबाबदार अणुशक्तीसंपन्न देश आहे आणि आमचे अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम फक्त राष्ट्रीय संरक्षणासाठीच आहेत.”
पाकिस्तानने इराणच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला
पाकिस्तान सरकारने असेही म्हटले की, “अशा संवेदनशील विषयांवर बेजबाबदार वक्तव्ये आणि चुकीच्या बातम्या केवळ जनतेला दिशाभूल करत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवरही परिणाम करतात.”या संपूर्ण घडामोडींमुळे युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि पाकिस्तानमधील विश्वास आणि भूमिका याबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाकिस्तानने सुरुवातीला इराणसोबत असल्याचा दावा केला आणि आता त्याच भूमिकेपासून माघार घेतल्यामुळे त्यांची ‘गंभीरता’ आणि ‘दृढता’ दोन्हीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.