
Iran Warns US Soldiers : अमेरिकेने इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याची हिंमत केली, तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा खणखणीत इशारा इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघारी यांनी दिला आहे. 'जर अमेरिकेने जमिनीवर युद्ध सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे सैनिक पर्शियन समुद्रातील शार्क माशांचं उत्तम खाद्य बनतील,' असं झोल्फाघारी यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. ३५०० सैनिकांसह अमेरिकेची 'USS Tripoli' ही युद्धनौका मध्य पूर्वेत दाखल झाल्याच्या वृत्तानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
एवढंच नाही, तर अमेरिका आणखी १०,००० सैनिक मध्य पूर्वेत पाठवण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघर खलिबाफ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, 'अमेरिका जगासमोर मुत्सद्देगिरीच्या गप्पा मारते, पण आतून मात्र इराणवर हल्ला करण्याची गुप्त तयारी करत आहे.' दरम्यान, २७ मार्च रोजी हल्ला झालेल्या खोनदाब अणुप्रकल्पाचं (Khondab heavy water plant) मोठं नुकसान झाल्याचं इराणने मान्य केलं आहे. हा प्लांट पूर्णपणे निकामी झाला असून सध्या बंद असल्याची माहिती इराणने दिली आहे.
दुसरीकडे, पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेले भारताचे दोन LPG टँकर्स लवकरच भारतात पोहोचणार आहेत. भारतीय नौदलाच्या संरक्षणात या दोन्ही जहाजांनी काल सामुद्रधुनी ओलांडली. 'BW TYR' नावाचा टँकर उद्या मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचेल, तर 'BW ELM' हा टँकर परवा मंगळूरच्या किनाऱ्यावर दाखल होईल. पर्शियन आखातात अडकलेल्या इतर १८ जहाजांनाही लवकरच होर्मुझ ओलांडण्याची परवानगी मिळेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. देशातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण पेट्रोल, डिझेल आणि LPG चा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असंही केंद्राने म्हटलं आहे. याशिवाय, देशभरात साठेबाजी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छापे टाकले जात असून कठोर कारवाई सुरू आहे.