
मध्य पूर्वेतील तणाव बुधवारी आणखी वाढला. इराण, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. अशातच इराणची लष्करी शाखा असलेल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) हिंदी महासागरात अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही, तर अत्यंत महत्त्वाच्या होरमुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) आता आपलं 'पूर्ण नियंत्रण' असल्याचंही इराणने म्हटलंय. या दाव्यांमुळे संपूर्ण प्रदेशात खळबळ उडाली आहे.
इराणच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे ६५० किलोमीटर दूर हिंदी महासागरात अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेवर मिसाइल डागलं.
गार्ड्सच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. मात्र, अमेरिकेच्या नौदलाने अद्याप या दाव्याची पुष्टी केलेली नाही, त्यामुळे समुद्रात नेमकं काय घडलं याबाबत अनिश्चितता आहे.
दरम्यान, इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे वरिष्ठ सहकारी मोहम्मद मोखबर यांनी सरकारी टीव्हीला सांगितलं की, अमेरिकेशी वाटाघाटी करण्याचा इराणचा कोणताही विचार नाही आणि गरज पडल्यास ते हवं तितका काळ मध्य पूर्वेतील युद्ध सुरू ठेवू शकतात.
ते म्हणाले, "आमचा अमेरिकन लोकांवर विश्वास नाही आणि त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला पाहिजे तोपर्यंत आम्ही युद्ध सुरू ठेवू शकतो."
याआधी रिव्होल्युशनरी गार्ड्सने जाहीर केलं होतं की, जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गांपैकी एक असलेल्या होरमुझच्या सामुद्रधुनीवर आता इराणी सैन्याचं 'पूर्ण नियंत्रण' आहे.
या जलमार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला मिसाइल किंवा ड्रोन हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा गार्ड्सने दिला आहे. जगातील मोठा तेल आणि वायू व्यापार याच अरुंद मार्गावरून होतो, त्यामुळे या घोषणेनंतर जागतिक चिंता वाढली आहे.
या वाढत्या धोक्याला उत्तर म्हणून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितलं होतं की, आखाती मार्गावरून जाणाऱ्या तेल टँकर्सना अमेरिकेचं नौदल संरक्षण देण्यास तयार आहे.
दुसरीकडे, इस्रायलने आपली हवाई मोहीम अधिक तीव्र केली असून, तेहरानमधील लक्ष्यांवर नव्या दमाचे हल्ले सुरू केले आहेत. इस्रायली लष्कराने सांगितलं की, त्यांनी इराणी राजधानीतील सुरक्षा कमांड सेंटर्ससह 'डझनभर' ठिकाणांवर हल्ले केले.
एका एएफपी पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, हल्ले सुरू असताना शहराच्या ईशान्य भागात आणखी एका स्फोटाचा आवाज ऐकू आला.
श्रीलंकेजवळही एक मोठी घटना घडली. तिथे इराणच्या नौदलाची एक युद्धनौका (फ्रिगेट) स्फोटानंतर बेटाच्या सागरी हद्दीबाहेर बुडाली. 'आयआरआयएस देना' (IRIS Dena) असं या जहाजाचं नाव असून, त्यावर १८० कर्मचारी होते. पहाटे जहाजाने मदतीसाठी सिग्नल पाठवल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ३२ खलाशांना वाचवण्यात आल्याचं श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी शोधमोहीम सुरू असून, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
वाढत्या युद्धावर आता आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी म्हणाले की, इराणवरील अमेरिका-इस्रायलचे हल्ले 'आंतरराष्ट्रीय कायद्याशी विसंगत' असल्याचे दिसतात.
या वाढत्या चिंतेचं प्रतिबिंब शेअर बाजारांवरही दिसलं. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर दुबई आणि अबू धाबीमधील आखाती शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले, तर व्यापक संघर्षाच्या भीतीने आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण झाली.
इराणने सांगितलं की, त्यांनी अमेरिका आणि इस्रायली लक्ष्यांवर ४० हून अधिक मिसाइल डागले आहेत. बुधवारी पहाटे इराणी मिसाइल आढळल्यानंतर जेरुसलेम आणि तेल अवीवसह इस्रायलच्या मोठ्या भागात सायरन वाजले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, पण जेरुसलेमजवळ मिसाइलच्या तुकड्यांमुळे आग लागल्याचं इस्रायली माध्यमांनी म्हटलं आहे.
त्याचवेळी, इस्रायलने लेबनॉनमध्ये इराण-समर्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहशी संबंधित ठिकाणांवर हल्ले केले. बेरूतच्या दक्षिण उपनगरात आणि इतर भागात स्फोट झाल्याची माहिती आहे. राजधानीच्या दक्षिणेकडील हल्ल्यांमध्ये सहा जण ठार आणि आठ जण जखमी झाल्याचं लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने बुधवारच्या संध्याकाळपासून तीन दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची आणि अंत्यसंस्काराची घोषणा केली आहे. याच हल्ल्यांमुळे सध्याचा संघर्ष सुरू झाला आहे.
या घोषणेनंतर, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इशारा दिला की, तेहरानने निवडलेला कोणताही उत्तराधिकारी देखील लक्ष्य बनू शकतो.
युद्धाच्या प्रत्यक्ष क्षेत्राबाहेरही सुरक्षेची चिंता पसरत आहे. कतारने सांगितलं की, त्यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित दोन गुप्तहेर गट उद्ध्वस्त केले आणि १० संशयितांना अटक केली आहे.
आखातात, दुबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळ ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली. यावरून वाढत्या तणावात राजनैतिक कार्यालये कशी लक्ष्य होत आहेत, हे दिसून येतं.
अमेरिकेनेही खबरदारीची पावलं उचलली आहेत. कराची आणि लाहोरमधील आपल्या वाणिज्य दूतावासातील अनावश्यक कर्मचाऱ्यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत, तर सौदी अरेबिया, सायप्रस आणि ओमानमधील कर्मचाऱ्यांनाही सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडण्याची परवानगी दिली आहे.
मध्य पूर्वेतील अमेरिकन सैन्याचे नेतृत्व करणारे ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितलं की, संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमधील जवळपास २,००० लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत.
मिसाइल हल्ले वाढत असल्यानं, जागतिक बाजारपेठांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि महत्त्वाचे सागरी मार्ग धोक्यात आल्यानं, हे संकट आता अधिक गंभीर वळणावर पोहोचल्याचं दिसतंय. याचे दूरगामी परिणाम केवळ या प्रदेशापुरते मर्यादित राहणार नाहीत.