
Inside Story of Khamenei Assassination : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना ठार करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने अनेक महिन्यांपासून एक गुप्त मोहीम आखली होती. या मोहिमेची वेळ शेवटच्या क्षणी बदलण्यात आली. खामेनेई आपल्या सर्व महत्त्वाच्या सहकाऱ्यांसोबत एक बैठक घेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, एकाच वेळी ३० बॉम्बचा वापर करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह अनेक जण ठार झाले, असं सूत्रांनी सांगितलं आहे. इस्रायली लष्कराने रविवारी या बॉम्बहल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात हल्ल्याची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते.
एकीकडे अमेरिका इराणसोबत अणुकरारावर चर्चा करत होती, तर दुसरीकडे अनेक महिन्यांपासून खामेनेई यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून होती. याची कल्पना असल्यामुळे खामेनेई अनेक महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. ते आपल्या अत्यंत सुरक्षित घरातच राहत होते. ही माहिती अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए (CIA) आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद (Mossad) यांच्याकडे होती.
त्यामुळे अमेरिकेने शनिवारी संध्याकाळी खामेनेई यांच्या घरावर हल्ला करण्याची तयारी केली होती. पण त्याच दरम्यान, खामेनेई शनिवारी सकाळी आपल्या सर्व खास लोकांसोबत एक बैठक घेत असल्याची गुप्त माहिती अमेरिकेला मिळाली. संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती आणि यात सरकार व लष्कराचे सर्व मोठे अधिकारी सहभागी होणार हे निश्चित होते.
तेहरानमधील 'बैत-ए रहबरी' नावाच्या भूमिगत बंकर असलेल्या घरात ही बैठक होणार असल्याची माहिती अमेरिकेने इस्रायलला दिली. त्यामुळे इस्रायलने हल्ल्याचा संपूर्ण प्लॅन बदलला. शनिवारी संध्याकाळऐवजी सकाळीच उपग्रहाच्या मदतीने विमानांद्वारे खामेनेई आणि इतर नेते बैठक घेत असलेल्या ठिकाणी अचूक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली आणि आत असलेले सर्वजण क्षणात ठार झाले, असं सूत्रांनी सांगितलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनेई यांच्या घरात दोन खोल बंकर होते, पण हल्ल्याच्या वेळी ते बंकरमध्ये नव्हते. त्यामुळे इस्रायलने डागलेली क्षेपणास्त्रं आणि बॉम्बमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. जर ते बंकरमध्ये असते, तर अमेरिकेला खास 'बंकर बस्टर' बॉम्ब वापरावे लागले असते, असं म्हटलं जात आहे.
अयातुल्ला सर्वोच्च का मानले जातात?
जगभरातील सुमारे ३० कोटी शिया मुस्लिमांचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून अयातुल्ला यांना ओळखले जाते. ते इस्लामिक न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि शरिया कायद्याचे तज्ञ मानले जातात. १९७९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी इराणची सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
इराणमध्ये अध्यक्ष असले तरी, प्रशासनावर अयातुल्ला यांचीच मजबूत पकड असते. मंत्र्यांची नियुक्ती त्यांच्या आदेशानुसारच होते. लष्करासोबतच 'रिव्होल्यूशनरी गार्ड' (IRGC) नावाचं एक विशेष सैन्यदलही अयातुल्ला यांच्या नियंत्रणाखाली असतं. देशाला युद्धाच्या दिशेने नेण्याचा किंवा शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा अंतिम निर्णयही त्यांचाच असतो.
अयातुल्ला अराफी इराणचे हंगामी सर्वोच्च नेते
खामेनेई यांच्या हत्येनंतर, त्यांच्या गटातील प्रमुख धार्मिक नेते अयातुल्ला अलीरेझा अराफी यांची देशाचे हंगामी सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत अराफी या पदावर कायम राहतील.
आपल्यावर हल्ला होणार हे निश्चित झाल्यावर, आपल्या मृत्यूनंतर काय करायचं हे खामेनेई यांनी ठरवून ठेवलं होतं. त्यांनी इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडल्याची बातमी होती. पण लारीजानी हे सुन्नी पंथाचे असल्याने, शिया पंथाचे असलेल्या अराफी यांना हे पद मिळालं आहे.