
Iran Retaliates Killing 3 US Soldiers : आपले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या हत्येनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी इराणने थेट अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या जवळ असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे तीन सैनिक ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. अमेरिकेने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इराणने अमेरिका-इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळे संयुक्त अरब अमिराती (UAE) मोठ्या संकटात सापडली आहे. इराणने UAE वर अत्यंत शक्तिशाली क्षेपणास्त्रं आणि ड्रोनने हल्ले केले आहेत. आतापर्यंत UAE च्या दिशेने 165 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं, 2 क्रूझ क्षेपणास्त्रं आणि 541 ड्रोन डागण्यात आले. UAE च्या संरक्षण यंत्रणेने यातील बहुतांश हल्ले परतवून लावले, पण काही क्षेपणास्त्रांचे अवशेष नागरी वस्तीत पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. हे मृत नागरिक पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशचे होते, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये 58 जण जखमी झाले असून, त्यात काही भारतीयांचाही समावेश असल्याचे UAE च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. UAE च्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, 152 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं आणि 506 ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. मात्र, 21 ड्रोन नागरी वस्तीत पडल्याने ही जीवितहानी झाली. सध्या आखाती प्रदेशात तणावाचे वातावरण असून UAE मध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या धोक्यामुळे UAE ने पुढील तीन दिवसांसाठी 'हाय अलर्ट' जाहीर केला आहे. 2, 3 आणि 4 मार्च रोजी देशातील सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या ICSE आणि ISC परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या काळात खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाची पर्यटन स्थळं बंद ठेवली असून, नागरिकांनी अत्यंत सावध राहावं, असं आवाहन UAE सरकारने केलं आहे. दुबईतील प्रसिद्ध 'ग्लोबल व्हिलेज' देखील तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.
पश्चिम आशियात युद्धाचे सावट गडद होत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून दुबईतील 'ग्लोबल व्हिलेज' तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आजपासून पुढील सूचना मिळेपर्यंत ग्लोबल व्हिलेजमध्ये प्रवेश बंद राहील. आखाती प्रदेशात इराणच्या लष्करी कारवाया आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे UAE सह अनेक देशांमध्ये हाय अलर्ट आहे. ग्लोबल व्हिलेजमध्ये पर्यटक आणि स्थलांतरित मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे गर्दी टाळणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरूच राहिल्यास, देश जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशारा UAE च्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रीम अल हाशिमी यांनी दिला आहे. 'CNN' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी UAE ची कठोर भूमिका स्पष्ट केली.