Thailand Tourist Scam: १००० रुपयांचं औषध सांगितलं, पण क्रेडिट कार्डमधून उडवले ७५ हजार! थायलंडमध्ये भारतीय पर्यटकाची फसवणूक

vivek panmand   | CMS
Published : Nov 01, 2026, 03:59 PM IST
Thailand Tourist Scam: १००० रुपयांचं औषध सांगितलं, पण क्रेडिट कार्डमधून उडवले ७५ हजार! थायलंडमध्ये भारतीय पर्यटकाची फसवणूक

सार

थायलंडच्या पटायामध्ये सुट्ट्या एन्जॉय करायला गेलेल्या एका भारतीय पर्यटकाला मोठा गंडा घालण्यात आलाय. भामट्यांनी त्याला १००० रुपयांचं हर्बल औषध विकलं, पण त्याच्या क्रेडिट कार्डमधून चक्क ७५ हजार रुपये कापून घेतले. या प्रकरणी पटाया पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

थायलंडमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेल्या एका भारतीय पर्यटकाची मोठी फसवणूक झाली आहे. अवघ्या १००० रुपयांचं हर्बल औषध विकण्याच्या बहाण्याने त्याच्या क्रेडिट कार्डमधून तब्बल ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम उडवण्यात आली. या प्रकरणी २८ वर्षीय भारतीय तरुणाने पटाया पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

१००० रुपयांचं औषध आणि ७५ हजारांचा चुना!

ही घटना २८ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. हा तरुण पटायामधील सेकंड रोडवर असलेल्या एका हर्बल दुकानाजवळून चालला होता. तेव्हा एका परदेशी व्यक्तीने त्याला गाठलं आणि एका औषधाची माहिती दिली. हे औषध केस वाढवण्यासाठी आणि इतर आरोग्याच्या समस्यांवर गुणकारी असल्याचा दावा त्याने केला. या औषधाची किंमत फक्त ३८० थाई बात (सुमारे १००० रुपये) असल्याचं त्याने तरुणाला सांगितलं. तरुण ते औषध घ्यायला तयार झाला आणि त्याने क्रेडिट कार्डने पेमेंट केलं. पण नंतर जेव्हा त्याने ट्रान्झॅक्शन चेक केलं, तेव्हा त्याच्या खात्यातून २७,६०० बात (सुमारे ७५,००० रुपये) कापले गेल्याचं त्याला समजलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने थेट पटाया सिटी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांचा तपास सुरू

तक्रार दाखल झाल्यानंतर, विक्रेत्याशी संबंधित एका व्यक्तीने या तरुणाशी संपर्क साधला. 'औषध परत द्या, आम्ही तुमचे पैसे परत करू', अशी ऑफर त्याने दिली. पण खरंच त्याने औषध परत करून पैसे घेतले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पर्यटकांना टार्गेट करून 'चमत्कारी औषध' असल्याचं सांगत चढ्या भावाने वस्तू विकणाऱ्या टोळ्यांबद्दल पटायामध्ये याआधीही अनेक तक्रारी आल्या आहेत. सध्या पटाया पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Finland Free Dating Trip: सिंगल आहात? फिनलंड देतंय फ्री ब्लाइंड डेटिंग ट्रिपची भन्नाट ऑफर!
Zohran Mamdani: हॅलोविन पार्टीत न्यूयॉर्कच्या महापौरांसमोर आला त्यांचाच डुप्लिकेट, पाहा भन्नाट व्हिडिओ