
मुंबई : आशिष शर्मा आणि मनाली पुरोहित या भारतीय वंशाच्या जोडप्याने आपली आयुष्यभराची कमाई ऑस्ट्रेलियात स्वतःचा कॅफे सुरू करण्यासाठी पणाला लावली होती. त्यांनी मेलबर्नच्या फिट्झरॉय नॉर्थ भागात 'अँड बोडेगा' (And Bodega) नावाचा व्हेगन कॅफे सुरू केला. पण शेजारच्या तंबाखूच्या दुकानाला अज्ञातांनी लावलेल्या आगीत त्यांच्या या स्वप्नाची अक्षरशः राखरांगोळी झाली आणि त्यांचं मोठं नुकसान झालं.
या जोडप्याने याच वर्षी जुलै महिन्यात हा कॅफे सुरू केला होता. आपल्या मनासारखा कॅफे उभा करण्यासाठी त्यांनी पाच महिन्यांहून अधिक काळ नूतनीकरणाचं काम केलं. यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून १ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ९५ लाख रुपये गुंतवले होते. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी जुनं फर्निचर विकत घेतलं आणि नूतनीकरणाचं बहुतांश काम स्वतःच केलं होतं.
१२ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:४५ च्या सुमारास शेजारच्या तंबाखूच्या दुकानाला भीषण आग लागली. काही अज्ञातांनी दुकानात घुसून ही आग लावल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आगीत तंबाखूचं दुकान पूर्णपणे जळून खाक झालं, पण त्यासोबतच या जोडप्याच्या कॅफेसह आजूबाजूच्या इतर दुकानांचंही मोठं नुकसान झालं. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
तंबाखूच्या दुकानाला लागलेल्या आगीच्या झळांमुळे कॅफेचं छत वितळलं. आशिषने सांगितलं की, कॅफेच्या भिंती आणि सर्व उपकरणांवर काजळी आणि राडारोडा साचला होता. पण त्यांचं हे संकट इथेच संपलं नाही. दुसऱ्याच दिवशी चोरांनी या जळलेल्या कॅफेमध्ये घुसून सुमारे ५,००० डॉलर्सची उपकरणं आणि तांत्रिक सिस्टीम चोरून नेली.
विमा कंपनीने त्यांना २५,००० डॉलर्सची भरपाई देऊ केली आहे, पण या रकमेतून आपलं नुकसान भरून निघणार नाही, असं या जोडप्याचं म्हणणं आहे. आता कॅफेची दुरुस्ती, नवीन उपकरणं खरेदी करणं आणि कर्मचारी तसंच पुरवठादारांची देणी देण्यासाठी त्यांनी निधी उभारणी (Fundraiser) सुरू केली आहे. या कठीण काळात स्थानिक लोक आणि आजूबाजूचे छोटे व्यावसायिक त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. लोकांच्या या पाठिंब्यामुळे आशिष आणि मनाली आता छोट्या स्वरूपात का होईना, पण आपला कॅफे पुन्हा सुरू करण्याच्या आशेवर आहेत.