
Hindu Journalist Shot Dead in Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या हिंसाचाराची मालिका थांबताना दिसत नाहीये. ताज्या घटनेत, एका ४५ वर्षीय हिंदू कारखाना मालक आणि पत्रकाराची भरचौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राणा प्रताप बैरागी असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राणा प्रताप बैरागी हे नरेल येथील 'दैनिक बीडी खबर'चे कार्यकारी संपादक होते आणि त्यांचा स्थानिक बर्फाचा कारखानाही होता. सोमवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास जेसोर जिल्ह्यातील मणिरमपूर उपजिल्ह्यातील 'कोपालिया बाजार' या गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी बैरागी यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी अद्याप या प्रकरणावर सविस्तर अधिकृत निवेदन दिलेले नाही किंवा कोणालाही अटक केलेली नाही. दरम्यान, बैरागी यांच्यावर काही गुन्हे दाखल होते आणि त्यांचे संबंध एका कट्टरपंथी गटाशी होते, असे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे; मात्र या दाव्यांना अद्याप कोणताही स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही.
१२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात अल्पसंख्याक, विशेषतः हिंदू समुदाय अत्यंत असुरक्षित झाला आहे. डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत अशा प्रकारच्या किमान पाच मोठ्या घटना समोर आल्या आहेत:
केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर सरकारी अधिकारीही या कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. कुरीग्राम जिल्ह्याच्या प्रशासक अन्नपूर्णा देबनाथ यांनी जमात-ए-इस्लामीच्या एका उमेदवाराचे नामांकन रद्द केल्यानंतर, इस्लामी कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात आणि गुन्हेगारांना कठोर संदेश देण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. निवडणुकीच्या काळात हिंदू समुदायाला वारंवार लक्ष्य केले जात असल्याने, बांगलादेशातील कायदा व सुव्यवस्था आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या रक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.