
लंडन: गुगल क्लाउडच्या लंडन डेटा सेंटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे ब्रिटनमधील बँकिंग, कुरिअर आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या सेवा अनेक तास ठप्प होत्या. लंडनमध्ये असलेल्या गुगलच्या 'युरोप वेस्ट २' या डेटा सेंटरमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने ही तांत्रिक अडचण निर्माण झाली.
ब्रिटन आणि आयर्लंडमधील अनेक मोठ्या कंपन्या आणि सरकारी यंत्रणांना हेच डेटा सेंटर क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर पुरवतं. या बिघाडामुळे ब्रिटनमधील प्रसिद्ध डिजिटल फिनटेक बँक 'रिव्होल्युट'चे (Revolut) ॲप आणि कार्ड पेमेंट सेवा पूर्णपणे बंद पडली. याचा थेट फटका ब्रिटनमधील कोट्यवधी युजर्सना बसला.
याशिवाय एचएसबीसी (HSBC), लॉयड्स (Lloyds) आणि हॅलिफॅक्स (Halifax) यांसारख्या मोठ्या बँकांच्या ऑनलाइन सेवा आणि ॲप्समध्येही अडचणी आल्याच्या तक्रारी युजर्सनी केल्या. 'रॉयल मेल' आणि 'डीपीडी' (DPD) या पार्सल डिलिव्हरी नेटवर्कच्या पार्सल ट्रॅकिंग आणि ऑनलाइन बुकिंग सेवाही विस्कळीत झाल्या. ब्रिटनमधील प्रसिद्ध रिअल इस्टेट पोर्टल 'राईटमूव्ह' (Rightmove) आणि 'अस्डा' (Asda) रिटेल नेटवर्कलाही या बिघाडाचा मोठा फटका बसला.