
Fact Check : आजकाल बिबळ्याचा ठिकठिकाणी सुळसुळाट झाला आहे. यासंबंधीच्या बातम्या टीव्ही, पेपर आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ तसेच माहिती कितपत सत्य असते, या प्रश्नच असतो. काहीवेळेस जुने व्हिडिओ आत्ताचे म्हणून व्हायरल केले जातात. काहीवेळेस ते भारतातील नसतातही! त्यातच आता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (AI) सारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे काल्पनिक आणि वास्तव यातील सीमाही धुसर झाली आहे.
वाघ म्हटलं की आपल्या सर्वांना भीती वाटते. पण एका तरुणीचा वाघासोबत मैत्री करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हा व्हिडिओ एक्स आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय आहे, ते तपासूया.
व्हिडिओमध्ये एक मोठा वाघ पलंगावर आराम करत असलेल्या तरुणीसोबत मैत्री करताना दिसत आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर हा व्हिडिओ कोणालाही खूप आकर्षक वाटेल. एखाद्या पाळीव कुत्र्याला किंवा मांजरीला गोंजारावे, तशी ही तरुणी धोकादायक वाघासोबत वागत आहे. वाघ आणि तरुणी यांच्यातील स्नेह दर्शविणारा हा व्हिडिओ एका युझरने एक्सवर पोस्ट केला आहे, जो खाली दिला आहे. 'प्रेम प्राण्यांनाही सहृदय बनवते' असेही व्हिडिओसोबतच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे. 'या मुलीचे आणि वाघाचे प्रेम पाहून तुमचे मत काय आहे?' असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर, दृश्यांमध्ये काही ठिकाणी कृत्रिमता आणि अपूर्णता स्पष्टपणे दिसली. वाघ आणि तरुणीच्या शरीराचे काही भाग अचानक नाहीसे होताना दिसतात. अशा चुका AI ने तयार केलेल्या दृश्यांमध्ये अनेकदा घडतात. यानंतर, AI डिटेक्शन वेबसाइट्सच्या मदतीने दृश्यांची सत्यता तपासली. या तपासणीत मिळालेले सर्व परिणाम सांगतात की, हा व्हिडिओ AI ने तयार केलेला आहे. इतकेच नाही, तर हा व्हिडिओ 'अल्फा रोर वाइल्डलाइफ' नावाच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेला दिसतो. 'अल्फा रोर वाइल्डलाइफ' या फेसबुक पेजच्या परिचयात असेही म्हटले आहे की हे AI ने तयार केलेली दृश्ये शेअर करण्यासाठी एक मनोरंजक पेज आहे. यावरून व्हायरल व्हिडिओमागील सत्य स्पष्ट होते.
निष्कर्ष
एक वाघ आणि तरुणी यांच्यातील स्नेहबंधाची कहाणी सांगणारा हा व्हिडिओ AI टूल्सने तयार केलेला आहे, हा व्हिडिओ खरा नाही.