
US Suspends Immigrant Visa Processing for 75 Nations : अमेरिकेत स्थलांतराशी संबंधित धोरणे अधिक कठोर करण्याच्या उद्देशाने, यूएस स्टेट डिपार्टमेंटने ७५ देशांतील नागरिकांसाठी इमिग्रंट व्हिसा प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या देशांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या नेतृत्वाखालील स्टेट डिपार्टमेंटने ही देशांची यादी जाहीर केली आहे. ही स्थगिती २१ जानेवारीपासून लागू होईल. मात्र, टुरिस्ट, बिझनेस यांसारख्या नॉन-इमिग्रंट (तात्पुरत्या) व्हिसांना हा निर्णय लागू होणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. यावर्षी होणारा विश्वचषक आणि २०२८ ऑलिम्पिक यांसारख्या स्पर्धांचे यजमानपद अमेरिकेकडे असल्याने नॉन-इमिग्रंट व्हिसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातच स्थलांतर नियम कठोर केले होते. कायमस्वरूपी निवासासाठी (Permanent Residency) अर्ज करणारे लोक भविष्यात अमेरिकन सरकारवर ओझे बनू नयेत, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. पीआरसाठीचे (PR) नियम आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना यूएस दूतावासाने मान्यता दिलेल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेणे बंधनकारक आहे.
क्षयरोग (टीबी) सारखे संसर्गजन्य आजार, अंमली पदार्थ-मद्य सेवनाचा इतिहास, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि हिंसक पार्श्वभूमी तपासली जाईल. अनिवार्य लसीकरण देखील केलेले असणे आवश्यक आहे. नवीन निर्देशांनुसार, अर्जदारांचे वय, आरोग्य, कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि नोकरी यासारख्या गोष्टींची सविस्तर तपासणी केली जाईल. अर्जदारांच्या इंग्रजी भाषेतील प्रवीणतेचे मूल्यांकन करण्यासाठी मुलाखत इंग्रजीमध्ये घेतली जाऊ शकते, असेही या निर्देशात म्हटले आहे.
अफगाणिस्तान, अल्बानिया, अल्जेरिया, अँटिग्वा आणि बार्बुडा, अर्मेनिया, अझरबैजान, बहामास, बांगलादेश, बार्बाडोस, बेलारूस, बेलिझ, भूतान, बोस्निया, ब्राझील, बर्मा, कंबोडिया, कॅमेरून, केप वर्दे, कोलंबिया, काँगो, क्युबा, डोमिनिका, इजिप्त, इरिट्रिया, इथिओपिया, फिजी, गांबिया, जॉर्जिया, घाना, ग्रेनेडा, ग्वाटेमाला, गिनी, हैती, इराण, इराक, आयव्हरी कोस्ट, जमैका, जॉर्डन, कझाकस्तान, कोसोवो, कुवेत, किर्गिझस्तान, लाओस, लेबनॉन, लायबेरिया, लिबिया, मॅसेडोनिया, मोल्दोव्हा, मंगोलिया, मॉन्टेनेग्रो, मोरोक्को, नेपाळ, निकाराग्वा, नायजेरिया, पाकिस्तान, रिपब्लिक ऑफ द काँगो, रशिया, रवांडा, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, सेनेगल, सिएरा लिओन, सोमालिया, दक्षिण सुदान, सुदान, सीरिया, टांझानिया, थायलंड, टोगो, ट्युनिशिया, युगांडा, उरुग्वे, उझबेकिस्तान, येमेन.