
दुबई: दुबईतील मारिना परिसरात असलेल्या एका 67 मजली गगनचुंबी इमारतीला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या घटनेनंतर सुमारे 4,000 रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मध्यरात्रीच्या अंधारात झालेली ही जीवघेणी धावपळ स्थानिक रहिवाशांसाठी अक्षरशः जीवाचा प्रश्न ठरली.
‘खलीज टाईम्स’च्या वृत्तानुसार, अनेक रहिवाशांनी असा आरोप केला आहे की फायर अलार्म वाजलाच नाही. धूर घरात भरत असतानाच काहींना शंका आली आणि त्यांनी बाहेर बघितलं, तेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि घबरटलेले नागरिक दिसले.
एका 24 व्या मजल्यावरील रहिवाशाने सांगितलं, “मी आणि पत्नी रात्री 9.45 वाजता जळण्याचा वास आला म्हणून उठलो. घरात पाहिलं, काहीच नव्हतं. पण बाल्कनीतून बघितलं, तेव्हा खाली लोक आणि फायरब्रिगेड दिसली. शेवटी आमच्या मित्राच्या फोनवरून समजलं की इमारतीला आग लागलीय!”
धुरामुळे जिना पूर्णपणे भरून गेला होता, त्यामुळे अनेकांनी जिवाची जोखीम पत्करून लिफ्टनेच खाली जाणं पसंत केलं. काहीजणांना धुरामुळे श्वास घेणंही कठीण झालं आणि त्यांनी जवळपासच्या हॉटेल्समध्ये आश्रय घेतला. “धुराचा त्रास झाल्यामुळे पत्नीची तब्येत बिघडली. 45 मिनिटं रस्त्यावर थांबलो, मग हॉटेलमध्ये गेलो,” असं एका रहिवाशाने सांगितलं.
MAG 218 नावाच्या शेजारच्या इमारतीतील रहिवाशी अहमदने सांगितलं, “धूर माझ्या अपार्टमेंटच्या हॉलवेपर्यंत आला. मी फक्त एक बॅग घेतली आणि जिन्याने खाली उतरलो. सध्या मित्राकडे राहत आहे. संपूर्ण परिसर हादरला.”
अनेकांनी इमारतीतील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आमच्या मजल्यावर फायर अलार्म वाजलाच नाही. एक तासानंतर मित्राच्या मॅसेजवरून समजलं,” असं 28 व्या मजल्यावरील रहिवाशाने सांगितलं. “यूएईतील अनेक इमारतींमध्ये चांगले अलार्म आणि स्प्रिंकलर असतात, पण इथे सगळं फेल झालं,” अशी प्रतिक्रिया आणखी एका रहिवाशाने दिली.
दुबई सिव्हिल डिफेन्स, पोलीस आणि अॅम्ब्युलन्स टीम्सच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. “एक पोलिस अधिकारी फार शांत होता आणि आम्हाला लिफ्टमधून सुरक्षित खाली उतरवण्यास मदत केली,” असं एका महिलेनं सांगितलं.
अनेक रहिवासी सध्या हॉटेल्समध्ये राहतात, तर काहींना धुरामुळे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. “आमचं घर अजूनही सुरक्षित आहे की नाही, माहिती नाही. आम्ही सध्या हॉटेलमध्ये आहोत आणि फक्त सुरक्षित आहोत, याचं समाधान आहे,” असं अॅशली नावाच्या रहिवाशाने सांगितलं.
ही दुर्घटना दुबईतील सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारी ठरली आहे. सुदैवाने, नागरिकांची सतर्कता आणि यंत्रणांचं तत्पर काम यामुळे हजारो जिव वाचवले गेले. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, हे मात्र नक्की.