
Dubai Airport Attack: मध्य पूर्वेत तणाव वाढत असताना, सोमवारी जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (DXB) एक संशयास्पद ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर विमानतळाजवळील एका इंधन टाकीला (fuel tank) भीषण आग लागली. सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळावरील विमानांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आणि या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही.
दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाजवळ ड्रोनशी संबंधित एका घटनेमुळे इंधन टाकीला फटका बसला, त्यानंतर तिथे आग लागली. आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि दुबई सिव्हिल डिफेन्सच्या टीमने वेगाने कारवाई करत आग पसरण्यापासून रोखली. अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केलं की आग यशस्वीरित्या विझवण्यात आली आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या काळात प्रवासी, कर्मचारी आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आले होते.
ड्रोनच्या घटनेनंतर, दुबई सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने (Dubai Civil Aviation Authority) खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील सर्व उड्डाणं तात्पुरती थांबवली. अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटबद्दलच्या माहितीसाठी थेट एअरलाइनशी संपर्क साधण्याचा आणि अधिकृत अपडेटची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. दुबईसारख्या ग्लोबल ट्रॅव्हल हबमध्ये उड्डाणं थांबणं ही जगभरातील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे, कारण हे विमानतळ दररोज हजारो आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाताळतं.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, विमानतळाच्या आसपास ड्रोन हल्ल्याचा धोका पहिल्यांदाच समोर आलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून विमानतळ, बंदरं आणि तेल प्रकल्पांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. यामुळेच सुरक्षा यंत्रणा आता ड्रोनच्या हालचालींवर अधिक बारकाईने नजर ठेवून आहेत.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागातील सुरक्षा परिस्थिती आधीच संवेदनशील बनलेली आहे. रिपोर्ट्सनुसार, अलीकडच्या संघर्षादरम्यान इराणने UAE च्या दिशेने १८०० हून अधिक मिसाइल आणि ड्रोन डागले आहेत. अर्थात, त्यापैकी बहुतांश एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. या युद्धामुळे आखाती प्रदेशातील विमानतळ, बंदरं आणि तेल सुविधांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.