
Donald Trump Signature on US Dollar Bills Breaks 165 Year Tradition वॉशिंग्टन: अमेरिकेच्या डॉलरच्या इतिहासात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने आता अमेरिकन डॉलरच्या नोटांवर थेट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही छापण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत आहे की, पदावर असलेल्या राष्ट्राध्यक्षांची सही चलनी नोटांवर येणार आहे. यामुळे १८६१ पासून चालत आलेली तब्बल १६५ वर्षांची जुनी परंपरा आता संपुष्टात येणार आहे.
या येत्या जून महिन्यापासून ट्रम्प आणि ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांच्या सही असलेल्या १०० डॉलरच्या पहिल्या नोटा छापल्या जातील. त्यानंतर हळूहळू इतर नोटांवरही हा बदल दिसेल. साधारणपणे, अमेरिकेच्या नोटांवर यूएस ट्रेझररची (कोषाध्यक्ष) सही असते, जसं आपल्याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची असते. पण आता ट्रम्प यांची सही आल्यामुळे यूएस ट्रेझररची सही नोटांवरून कायमची काढली जाईल. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त हा बदल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात ट्रम्प यांचं चित्र असलेल्या सोन्याच्या नाण्यांनाही मंजुरी मिळाली होती. ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी म्हटलं आहे की, "हे पाऊल अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि स्थिरता दर्शवतं." सध्या चलनात असलेल्या नोटांवर जो बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
अमेरिकेच्या कायद्यानुसार, कोणत्याही जिवंत व्यक्तीचे चित्र चलनी नोटांवर छापता येत नाही. मात्र, सहीच्या बाबतीत ट्रेझरी विभागाला विशेष अधिकार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी 'कमिशनर ऑफ फाइन आर्ट्स'ने ट्रम्प यांचं चित्र असलेल्या सोन्याच्या नाण्यांनाही परवानगी दिली होती.
ट्रेझरी सचिवांनी या निर्णयाला 'ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील आर्थिक यशाचं प्रतीक' म्हटलं आहे. पण दुसरीकडे, टीकाकारांच्या मते, सर्व सरकारी गोष्टींवर स्वतःचा ठसा उमटवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. याआधी कोविड काळात मदत म्हणून दिलेल्या चेकवरही ट्रम्प यांनी आपलं नाव छापलं होतं, ज्यावरून मोठा वाद झाला होता.