
सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये अनेक मानवनिर्मित चमत्कार पाहायला मिळतात. आता सौदी अरेबिया अजून एका मोठ्या प्रोजेक्टची तयारी करत आहे. सौदी अरेबियाने वाळवंटाच्या मधोमध तब्बल 1.7 मैल लांबीचा कृत्रिम तलाव बांधण्याची योजना आखली आहे. यासोबतच तीन मोठी धरणंही बांधली जाणार आहेत. या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाचं कोणतंही मोठं नुकसान होणार नाही, असा दावा केला जात आहे. यातून दर आठवड्याला 90,000 घनमीटर पाणी उपलब्ध होईल. या महाकाय प्रोजेक्टसाठी सौदी अरेबियाने 4.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
Saudi Arabia Building 1.7 Mile Artificial Lake in Desert : सौदी अरेबियाचा हा 'NEOM' नावाचा प्रोजेक्ट वाळवंटाच्या आतपर्यंत विस्तारलेला असेल. इटलीची बांधकाम कंपनी 'Webuild' हे काम करणार आहे. 'Webuild' कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य सौदी अरेबियातील 'ट्रोजेना' या पर्वतीय पर्यटन स्थळाजवळ हा प्रोजेक्ट उभारला जाईल. यात 1.7 मैल लांबीचा मानवनिर्मित गोड्या पाण्याचा तलाव आणि तीन धरणांचा समावेश असेल, ज्यासाठी 4.7 अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे.
या प्रोजेक्टमुळे इथे वर्षभर स्कीइंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. सोबतच, इथे लक्झरी हॉटेल्स असलेले रिसॉर्ट्सही असतील. यामुळे एक वेगळंच आकर्षक जग निर्माण होईल.
ट्रोजेना पर्वतांजवळ होणार हे बांधकाम
हे ट्रोजेना पर्वत ताबुक प्रदेशात, अकाबाच्या आखातापासून सुमारे 31 मैल अंतरावर आहेत. त्यांची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 4,900 ते 8,500 फूट आहे. या उंचीमुळे इथलं तापमान खालच्या वाळवंटी प्रदेशापेक्षा थंड असतं आणि इथला भूभाग जलाशयासाठी योग्य आहे.
Webuild कंपनीच्या मते, हा तलाव सुमारे 370 एकर किंवा अंदाजे 0.6 चौरस मैल परिसरात पसरेल. त्यात एक बेट सुद्धा असेल, जिथे वनस्पती उद्यान (botanical walks) आणि डायव्हिंगची सोय असेल. हा सुमारे 4.3 अब्ज युरो (अंदाजे 4.7 अब्ज डॉलर्स) किमतीचा प्रोजेक्ट सौदीच्या 'व्हिजन 2030' या राष्ट्रीय योजनेचा भाग आहे, ज्याचा उद्देश देशाच्या अर्थव्यवस्थेला विविध क्षेत्रांमध्ये विस्तारणं आहे.
तीन धरणं
मुख्य धरण सुमारे 476 फूट उंच आणि 1,560 फूट लांब असेल, जे रोलर-कॉम्पॅक्टेड काँक्रीटने बनवले जाईल. दुसऱ्या धरणासाठीही याच तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तर तिसरं धरण दगडांनी (rockfill structure) बांधलं जाईल, ज्यामुळे दरी सर्व बाजूंनी सुरक्षित होईल.
या प्रोजेक्टसाठी तलावाच्या ठिकाणी खोदकाम सुरू झालं असून, आतापर्यंत सुमारे 30 लाख घनमीटर खडक खोदण्यात आला आहे. दर आठवड्याला सुमारे 90,000 घनमीटर वेगाने खोदकाम सुरू आहे. अमेरिकन मापांनुसार हे जवळपास 39 लाख क्यूबिक यार्ड्स होतं. खोदकामातून निघालेल्या दगडांचा वापर तलावाच्या अस्तरीकरणासाठी आणि धरणाच्या बांधकामासाठी केला जाईल. या पुनर्वापरामुळे अतिरिक्त खाणकाम टाळता येईल.
पाणी कुठून येणार?
समुद्राचं खारं पाणी शुद्ध करून पिणाऱ्या या देशात एवढ्या मोठ्या तलावासाठी गोडं पाणी कुठून येणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. NEOM प्रोजेक्टनुसार, पाण्याची संपूर्ण गरज अपारंपरिक ऊर्जेवर चालणाऱ्या डिसॅलिनेशन प्लांटमधून (समुद्राचं पाणी गोडं करणारे प्रकल्प) पूर्ण केली जाईल. तसेच, 100% सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सिंचनासाठी पुन्हा वापरलं जाईल.