Donald Trump : 'आधी स्वतःला फिट कर!'; तब्येतीवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर भडकले ट्रम्प

Published : Oct 30, 2026, 08:39 AM IST
Donald Trump : 'आधी स्वतःला फिट कर!'; तब्येतीवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर भडकले ट्रम्प

सार

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन रॅलीज रद्द केल्यावर ट्रम्प यांच्या तब्येतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ट्रम्प भडकले अन् त्यांनी थेट पत्रकाराच्या वजनावरून आणि फिटनेसवरून वैयक्तिक टीका केली.

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी पत्रकारांशी बोलत असताना एका पत्रकारावर भडकले. ट्रम्प यांच्या तब्येतीबाबत आणि कॅन्सस तसंच आयवा येथील प्रचार सभा रद्द करण्याबाबत पत्रकाराने प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी त्या पत्रकाराच्या शरीरयष्टीवरून आणि फिटनेसवरून त्याच्यावर थेट वैयक्तिक टीका करत 'आधी स्वतःला फिट कर' असा सल्ला दिला.

देशभरात काही आठवडे प्रचार केल्यानंतर ट्रम्प यांना अस्वस्थ वाटत आहे का आणि त्यामुळेच त्यांनी कॅन्ससचा दौरा रद्द केला का, असा प्रश्न या पत्रकाराने विचारला होता. हा प्रश्न ऐकताच ट्रम्प यांचा पारा चढला. 'असा प्रश्न विचारणारा तू स्वतःच आजारी आहेस', असं ट्रम्प पत्रकाराला म्हणाले. मी फक्त तुमच्या आरोग्याची चौकशी करत आहे, असं पत्रकाराने स्पष्ट केलं. पण ट्रम्प यांनी त्या पत्रकाराच्या फिटनेसवर बोलणं सुरूच ठेवलं. त्यांनी पत्रकाराची नक्कल केली आणि ट्रम्प म्हणाले, 'या माणसाकडे बघा, हा किती अनफिट आहे.'

सभा रद्द आणि प्रचाराची सद्यस्थिती

ट्रम्प यांना पुन्हा त्यांच्या तब्येतीबद्दल विचारलं असता, माझी प्रकृती उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला. 'मी गेल्या दोन आठवड्यांपासून सतत फिरतोय, मला अगदी व्यवस्थित वाटतंय', असं सांगून त्यांनी पुन्हा पत्रकारावर वैयक्तिक टीका केली. 'तू अत्यंत वाईट दिसतोयस, आधी स्वतःला फिट कर', असं ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेत मंगळवारी मध्यावधी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर कॅन्सस आणि आयवामध्ये रिपब्लिकन पक्षाची जोरदार लढत सुरू आहे. मात्र, ट्रम्प यांनी या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या वीकेंडच्या प्रचार सभा अचानक रद्द केल्या. शनिवारी कॅन्ससमधील सॅलिना आणि रविवारी आयवामधील ड्युब्यूक येथे या सभा होणार होत्या. कॅन्ससला जाण्याची गरज मला वाटत नाही, असं ट्रम्प म्हणाले; तसंच तिथे रिपब्लिकन उमेदवार रॉजर मार्शल जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर रिपब्लिकन नॅशनल कमिटीने आयवातील सभाही रद्द झाल्याचं स्पष्ट केलं.

पुढील प्रचाराची रणनीती

प्रत्यक्ष सभा घेण्याऐवजी ट्रम्प यांच्या 'मॅगा इनकॉर्पोरेशन' (MAGA Inc.) या ग्रुपने टेलि-रॅलीज घेण्याचं ठरवलं आहे. मतदानाच्या दिवसाआधी कॅन्सस आणि आयवासह किमान १९ राज्यांमध्ये ट्रम्प फोनद्वारे मतदारांशी संवाद साधतील. १ ऑक्टोबरपासून ट्रम्प यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी १९ राज्यांमध्ये २५ प्रचार सभा घेतल्या आहेत. अमेरिकन सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजवर रिपब्लिकन पक्षाचं नियंत्रण राहमार की नाही, हे या निवडणुकीवरून ठरणार आहे.

दोन सभा रद्द केल्या असल्या तरी शुक्रवारी ट्रम्प फ्लोरिडातील एका प्रचार सभेला हजेरी लावणार आहेत. याआधीही त्यांनी सततच्या प्रचार सभांमुळे येणाऱ्या शारीरिक थकवाबद्दल भाष्य केलं होतं. सोमवारी मिसिसिपीतील एका सभेत बोलताना, 'दररोज सभा घेण्यासाठी देवाने आपले व्होकल कॉर्ड्स (घशाचे स्नायू) बनवलेले नाहीत', असं ट्रम्प म्हणाले होते.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

NVIDIA: ३३ वर्षांची ही कंपनी अचानक सगळीकडे का दिसतेय?
Cockroach Milk: झुरळाचं दूध सुपरफूड? इलॉन मस्क म्हणाला 'किळसवाणं'