China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय

Published : Oct 12, 2026, 02:15 PM IST
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय

सार

मध्य चीनमधील एका महिलेने १४ दशलक्ष युआन (सुमारे २ दशलक्ष डॉलर्स) खर्च करून तब्बल १९६ पार्किंग स्पॉट्स खरेदी केले. आता ती हेच स्पॉट्स ८० टक्के जास्त दराने विकत असल्याने स्थानिक रहिवासी संतापले आहेत.

मुंबई : मध्य चीनमधील एका महिलेने १४ दशलक्ष युआन (२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) देऊन तब्बल १९६ पार्किंग स्पॉट्स खरेदी केले. आता ती हे स्पॉट्स ८० टक्के जास्त दराने विकत आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवासी चांगलेच भडकले आहेत. तिने केलेली ही खरेदी सोसायटीच्या एकूण पार्किंग क्षमतेच्या ४० टक्के आहे. स्वस्त पार्किंग न मिळाल्याने रहिवासी आणि या महिलेमध्ये कायदेशीर वाद सुरू झाला.

हा वाद हुनान प्रांतातील चांगशा शहरातल्या एका सोसायटीत घडला आहे. या सोसायटीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. २०१८ मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. पण सुरुवातीला तिथे दुकाने, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने ग्राहकांनी फारसा रस दाखवला नाही.

हुनान टीव्हीच्या वृत्तानुसार, सुविधांअभावी तिथले फ्लॅट्स आणि पार्किंग स्पॉट्स घेण्यास कोणीही उत्सुक नव्हते.

अशी परिस्थिती असतानाही वू (Wu) नावाच्या एका महिलेने यात गुंतवणुकीची मोठी संधी पाहिली. तिने एकाच झटक्यात १४ दशलक्ष युआन मोजून तब्बल १९६ पार्किंग स्पॉट्स विकत घेतले. पैशांची चणचण असल्याने बिल्डरनेही हा मोठा व्यवहार लगेच मान्य केला. स्थानिक प्रशासनाच्या विकास योजनांचा अभ्यास करूनच वू हिने हा धाडसी निर्णय घेतला होता.

या परिसराचे पुढे काय होणार, याबाबत इतर लोक साशंक होते. पण वू हिला खात्री होती की भविष्यात या भागाचा नक्कीच विकास होईल. तिचा हा अंदाज अगदी खरा ठरला. या परिसराचा वेगाने विकास झाला, सोसायटीतले सगळे फ्लॅट्स हातोहात विकले गेले आणि साहजिकच पार्किंगची मागणीही वाढली.

पार्किंगची जागा कमी पडू लागल्याने वू हिने आपल्या जागेवर पार्किंग लॉक लावले. जेणेकरून तिच्या परवानगीशिवाय कोणीही तिथे गाडी उभी करू शकणार नाही. त्यानंतर तिने काही स्पॉट्स दरमहा ५०० युआन (७५ डॉलर्स) भाड्याने देण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये बिल्डरने ठरवलेल्या भाड्यापेक्षा ही रक्कम दुप्पट होती.

रहिवाशांनी हे भाडे ३०० युआनपर्यंत कमी करण्याची विनंती केली, पण वू हिने स्पष्ट नकार दिला. नंतर तिने हे पार्किंग स्पॉट्स प्रत्येकी १ लाख युआन (१५,००० डॉलर्स) या दराने विक्रीला काढले. काहींची किंमत तर मूळ किमतीपेक्षा तब्बल ८० टक्के जास्त होती. या वाढीव दरांमुळे रहिवाशांचा राग आणखीनच वाढला. हे स्पॉट्स जुन्याच दराने विकले जावेत, अशी त्यांची मागणी होती.

पार्किंग मिळणे कठीण झाल्याने वू हिची ही गुंतवणूक सोसायटीतल्या वादाचे मोठे कारण बनली. पार्किंगच्या तुटवड्याचा फायदा घेऊन ती नफा कमवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. हा वाद सोडवण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्यालाही पाठवण्यात आले होते.

पण या मध्यस्थीतून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर काही रहिवाशांनी एकत्र येत वू हिच्या विरोधात कोर्टात धाव घेतली.

पार्किंगची जागा ही निवासी पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नफा कमवण्यासाठी एकाच व्यक्तीने त्यावर मक्तेदारी मिळवणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद रहिवाशांनी केला. वू आणि बिल्डर यांच्यातील खरेदी करार रद्द करण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केली. पण फेब्रुवारी २०२४ मध्ये चांगशा येथील स्थानिक न्यायालयाने वू हिच्या बाजूने निकाल दिला आणि रहिवाशांना मोठा धक्का बसला.

कोर्टाने नोंदवले की, जेव्हा बिल्डरने सुरुवातीला पार्किंग स्पॉट्स विक्रीसाठी काढले होते, तेव्हा रहिवाशांना ते खरेदी करण्याची संधी होती, पण त्यांनी ती नाकारली. दुसरीकडे, जेव्हा मागणी नव्हती तेव्हा वू हिने पैशांची जुळवाजुळव करून जोखीम पत्करली आणि गुंतवणूक केली.

त्यामुळे तिची ही घाऊक खरेदी कायदेशीर असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. तसेच, एखादी व्यक्ती किती पार्किंग स्पॉट्स खरेदी करू शकते, यावर कोणताही कायदेशीर निर्बंध नसल्याचेही कोर्टाने नमूद केले.या निकालामुळे वू हिला तिची गुंतवणूक कायम ठेवण्याचा अधिकार मिळाला. पण दुसरीकडे, वाढते दर आणि पार्किंगच्या कमतरतेमुळे सोसायटीतल्या रहिवाशांमधील असंतोष मात्र तसाच आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चीनमध्ये महिलेने स्वस्तात खरेदी केले १९६ पार्किंग स्पॉट्स, आता ८०% नफ्याने विकतेय!